शिर्डी : शिर्डी येथे बांधकाम मजुराची हत्या करणार्या आरोपीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
याबाबत संजय मधूकर पवार ( वय 41 वर्षे , धंदा- सेन्ट्रींग मजुरी, रा. राजगुरुनगर, शिर्डी, ता. राहाता) यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीत म्हटले आहे की व माझ्या मामाचा मुलगा राजेंद्र आंतवन धीवर ( रा.राजगुरुनगर , शिडी ) असे दोघे राहाता येथील मजुरीचे काम संपवून सायकलवरुन 29 जूनला घरी जात होतो.
सायंकाळी साडेसातच्या सुमारास सायकल चालवून थकल्यामुळे राहाता - शिर्डी रस्त्यावरील निसर्ग हॉटेल जवळ मोकळ्या जागेत बसलो. यावेळी दोन मोटार सायकलवरुन चार अनोळखी मुले त्यांच्याजवळ आले व मोटार सायकली रस्त्याचे कडेला उभ्या करुन आमच्याकडे येऊन काडीचाही पेटी मागितली.
त्यावेळी राजेद्रे धीवर याने त्याचे जवळील पिशवीमधून माचीस काढून सायकलचे सिटवर ठेवून सदर अनोळखी मुलांना घेण्यास सांगितले. त्याचा त्यांना राग आल्याने त्यांनी त्यांचे हातातील धारदार हत्याराने राजेंद्र धीवर याच्या डोक्यावर , पोटावर वार करण्यास सुरुवात केली.
यावेळी मलाही पकडा व मारा, असे हल्लेखोर म्हणत असताना मी तेथून पळून गेलो. या प्रकरणी शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरवात केली. सुरवातीला सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रीक विश्लेषण करून त्यातून आरोपीचे फोटोची स्पष्टता करून सदरचे संशयित आरोपीतांचा येण्याजाण्याचा मार्ग हा नाशिक पर्यत असल्यांचे तपासात निष्पन झाले.
आरोपी हे नाशिक येथील असल्याची खात्री झाल्याने तपास पथकाने आरोपींचे फोटो व मो.सा चे वर्णन व त्यांनी केलेल्या गुन्हा बाबतची माहिती नाशिक शहर आयुक्तालयातील गुन्हे शाखेला कळविण्यात आली.
नाशिक शहर आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या मदतीने आरोपीचा शोध घेत असतांना नाशिक गुन्हे शाखेने आरोपी राजू उर्फ चंद्रहास सुभाष उबाळे (वय 19, रा . पाथर्डी गाव , सुखदेव नगर , नाशिक), अविनाश प्रल्हाद सावंत (वय 19, रा. पाथर्डी गाव, नाशिक) यांना ताब्यात घेतले व स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांच्याकडे हस्तांतरीत केले.
आरोपींना शिर्डी पोलिस ठाणे येथे आणून त्यांच्याकडे गुन्हयाचे अनुषंगाने विचारपूस केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. त्यांना अधिक विश्वासात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत कसून चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा हा अमोल लोंढे , रा. शिडी याचे सांगण्यावरुन हसीम खान , (रा . नालासोपारा ,ठाणे), कुलदीप पंडीत (रा . पाथडी गांव , नाशिक), गॅस उर्फ साहिल शेख (रा. मोरवाडी, नाशिक) व साहिल पठाण (रा. पाथर्डी गांव , नाशिक यांच्यासह केला असल्याची माहिती दिल्याने सदर माहितीचे आधारे आरोपींचा शोध घेतला. परंतु सदरचे आरोपी मिळून आले नाही. सदरचा गुन्हा अमोल लोंढे याचे सांगणेवरुन केला असल्याची माहिती आरोपींनी दिल्याने अमोल सालोमन लोढे (वय 32, रा . कालिका नगर , शिर्डी) यास शिर्डी येथून तपास पथकाने ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याबाबत चौकशी केली.
त्याने मयत राजेंद्र धीवर याच्य्या समवेत गेल्या दहा ते बारा वर्षापासून वाद चालू होते. धीवर हा नेहमी त्रास देत होता . त्याबाबत सन 2013 मध्ये शिर्डी पो.स्टे . येथे तक्रार दिलेली होती. परंतु त्यानंतरही तो नेहमी त्रास देत होता. त्या कारणावरुन मित्र अरविंद सोनवणे (रा. शिर्डी) याचे ओळखीने राजू उर्फ चंद्रहास सुभाष उबाळे व त्याचे साथीदारांना चार लाखाची सुपारी देवून त्यांच्याकरवी धीवर याचा खून केला असल्याचे सांगीतले. त्यावरुन आरोपी अरविंद सोनवणे याचा शोध घेवून त्याला अटक केली.
Post a Comment