केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारात खा.प्रितम मुंडे यांना डावलल्याच्या निषेधार्थ...पाथर्डी भाजपा पदाधिकाऱ्यांचे सामुहिक राजीनामे


पाथर्डी : बीड लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. प्रितम मुंडे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश न झाल्याच्या निषेधार्थ पाथर्डीचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष,;पंचायत समितीचे सभापती यांच्यासह तालुक्यातील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे सामुहिक राजीनामे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्याकडे सूपुर्द केले.

सामुहिक राजीनामा नाट्याची पक्षासह तालुक्याच्या राजकारणात उलटसुलट चर्चा सुरू आहे.भाजपाच्या राष्ट्रीय सचिव लोकनेत्या पंकजा मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग तालुक्यात आहे. ओबीसी चळवळीचे मुख्य केंद्र म्हणून एका बाजुने पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाकडे बघितले जात असताना. जातीच्या चौकटीत बसवण्याचा उत्साही कार्यकर्त्यांचा प्रयत्न खऱ्या अर्थाने मुंडे समर्थक असलेल्यांना रुचलेला नाही.

राजीनामे देणाऱ्यांमध्ये माजी मंत्री पंकजा मुंडे,खा.डॉ.सुजय विखे व आ. मोनिका राजळे  यांच्याशी थेट संपर्क असणाऱ्यां कार्यकर्त्यांचा समावेश आहे. राजीनामा पत्रात पदाधिकाऱ्यांनी पदाचे राजीनामे भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे यांच्याकडे दिले.यामध्ये नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे यांचा राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांकडे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके यांचा राजीनामा नगराध्यक्षांकडे सुपुुर्द व्हायला हवे होते. दोन दिवसांपूर्वी सभापती सुनीता दौंड यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे देण्याऐवजी भाजपा जिल्हाध्यक्षांकडे दिला आहे‌.

तालुकाध्यक्ष माणिक खेडकर यांनी पदाचा राजीनामा दिल्याने पक्षाच्या घटनेनुसार सर्व कार्यकारणी आपोआपच बरखास्त होते.याची माहिती नसणाऱ्या काही पदाधिकाऱ्यांनी सुद्धा राजीनामे दिले आहेत. राजीनामा देऊन पक्षांवर दबाव वाढविण्याचा उत्साही व भावनाप्रधान कार्यकर्त्यांचा प्रयत्न काही प्रमाणात माजी मंत्री तथा भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्यापुढील अडचणी वाढवणारा ठरणार आहे.

प्रतीकात्मक राजीनामे देऊन पक्ष नेतृत्वाकडे नाराजी व्यक्त होण्याऐवजी सोशल मीडियासह सर्वच मीडियाला पक्षातील नाराजीचे आयते कोलीत मिळाल्याबद्दल मुंडे निष्ठावंतांची काळजी वाढल्याची चर्चा राजीनामा सत्रानंतर सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पक्षश्रेष्ठीं कडून सर्व राजीनामे मागवुन घेऊन त्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याबाबत हालचाली सुरू झाल्या असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी दरम्यान पक्षांपुढे कोण आव्हान उभे करू शकतो याची पडताळणी केली जाणार आहे.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर भाजपाच्या राष्ट्रीय सचिव लोकनेत्या पंकजा मुंडे यांची पत्रकार परिषद परिपक्व नेत्यासारखी झाली.त्यात मुंडे यांनी मी काही फक्त वंजारी समाजाचे नेतृत्व करीत नसून सर्वच समाजातील कार्यकर्ते आपल्यावर प्रेम करतात अशा स्वरुपाचे वक्तव्य केले.भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याची तीव्रता वाढली आहे.त्यात स्थानिक नेत्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी उडी घेतली.

खासदार प्रितम मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या विषयावरून  पक्षांतर्गत कुरघोडीचे राजकारण तापले आहे.सोशल मीडियातून खासदार,आमदारांनी राजीनामे द्यावेत अशा पोस्ट मुंडे समर्थक व विरोधकांकडूनही सुरू आहेत.अशा मागणीमुळे पक्षात संबंधित नेत्यांचे समर्थक सुद्धा सावध झाले आहेत.

येत्या सहा महिन्यात नगरपालिका,पंचायत समिती, जिल्हा परिषद,बाजार समिती अशा निवडणुका होणार असून त्यातही आता अशीच गटबाजी उफाळून येण्याची भिती निष्ठावान कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.

लोकनेत्या पंकजा मुंडे,खासदार डॉ.प्रितम मुंडे यांच्यावर कार्यकर्त्यांचे अतोनात प्रेम आहे.खा. प्रितमताई मंत्री होतील अशी कार्यकर्त्यांची भावना होती त्यांना संधी मिळाली नाही.सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे सुपूर्द केले.याबाबत प्रदेशाध्यक्षांची चर्चा करून निर्णय घेऊ पक्ष व श्रेष्ठी योग्य निर्णय घेतील असा विश्वास पक्षश्रेष्ठींकडे आमची नाराजी आम्ही व्यक्त करू.

-अरुण मुंडे,  जिल्हाध्यक्ष भाजपा

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post