पारनेर : गेली दीड वर्षांपासून कोरोना महामारीने सर्वच क्षेत्रात भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. पहिल्या लाटेत लॉकडाउनमुळे सर्व कंपन्या, शैक्षणिक क्षेत्रातील मराठी शाळा, माध्यमिक, उच्च महाविद्यालये बंद करण्यात आली.
व्यवसाय, उद्योगधंदे कोलमडले, कधी न येणारे शहरातील ग्रामवासीय वर्षभर गावाकडे थांबले. दुसऱ्या लाटेने आणखीनच कहर केला. लॉकडाउन वाढवले सर्व व्यवस्था ठप्प झाली.
मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यास करण्यासाठी मोबाईल व्यवस्था करणे गरजेचे होते. मात्र ग्रामीण भागातील ८० टक्के सर्वसामान्य विद्यार्थ्यांना परस्थितीमुळे मोबाईल घेणे शक्य झाले नाही.
यासाठी काही गुरुजनांनी दहा पंधरा विद्यार्थ्यांना एकत्र करीत पाटी,पुस्तक,मास्क सॉनिटायझर देत विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम केले.
लाखेवाडी (मलठण, ता.शिरूर) येथील मुख्याध्यापक दत्तात्रय जगताप यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आँनलाईन शिक्षण सुरू केले. परंतु काही गरीब पालकांकडे मोबाईल नसल्याने त्यांनी शेतमजूर महिला शेतात खुरपणी करायला गेल्यावर त्या ठिकाणी जाऊन बाभळीचा झाडाला फळा लटकवून बांधावरच शिक्षणाचा श्रीगणेशा केला.
गुरूजी आपल्या शेतात मुलांना शिकवतात हे पाहून महिलांना आनंद झाला. गुरूजींचा हा अनोखा उपक्रम पाहून त्यांना गहिवरून आले. सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्या साठी गुरूजींचे सुरू असलेले प्रयत्न पाहून ग्रामस्थही भारावले.
दत्तात्रय जगताप यांनी यापूर्वीही कोरोनाचा काळात ऊसतोड मजुरांच्या मुलांना ऊसाच्या फडात जाऊन तब्बल 2 महिने शिक्षण दिले होते.
ते प्रसिद्ध कवि असून त्यांची तीन पुस्तके प्रकाशित झालेली आहे. अशा या हरहुन्नरी शिक्षकाच्या उपक्रमाचे गटशिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढेसाहेब ,विस्तार अधिकारी महादेव बाजारे, केंद्रप्रमुख रामदास बोरूडे, पारनेर तालुका पत्रकार संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक दत्ता उनवणे, शिरूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते, लाखेवाडी ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.
Post a Comment