नगर : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचा बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असणारा वेतन विलंबाचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक परिषदेने राज्य शिक्षक परिषदेकडे पाठपुरावा केला होता. त्या अनुषंगाने शिक्षक परिषदेचे संस्थापक आमदार संजय केळकर यांनी नाशिक विभागीय आयुक्तांशी पत्रव्यवहार करून जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे वेतन वेळेवर होणे बाबत कार्यवाही करण्याबाबत सूचना केली होती.
या निवेदनाची दखल घेऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र क्षीरसागर यांनी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या वेतनाच्या संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. काल या संदर्भामध्ये शिक्षक परिषदेचे राज्य संपर्कप्रमुख रावसाहेब रोहोकले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करताना वेतन विलंबाबाबतही चर्चा केली.
त्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी जिल्हा परिषदेचे वित्तअधिकारी आंधळे यांना प्राथमिक शिक्षकांचे वेतन दरमहा वेळेवर होण्यासाठी सर्व शिक्षकांचे वेतन सीएमपी प्रणालीने करण्याबाबत अभ्यासगटाची नियुक्ती करून जालना जिल्हा परिषद येथे समक्ष भेट देऊन माहिती घेऊन त्यासंबंधीचा अहवाल सादर करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
त्याचबरोबर शिक्षणाधिकारी यांचे प्राथमिक शिक्षकांच्या वेतनात संदर्भात असलेले खाते सेंट्रल बँकेतून स्टेट बँकेत उघडणे संदर्भाने गेल्या दोन वर्षांपासून संघटना पातळीवर प्रयत्न सुरू होते. याबाबतही तात्काळ दखल घेऊन सदर खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्याबाबतचे निर्देश माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले आहेत.
प्राथमिक शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून जिल्हा परिषद प्रशासनाने टाकलेले पाऊल अभिनंदनीय आहे. लवकरच हा प्रश्न सुटेल अशी अपेक्षा यावेळी राज्य संपर्कप्रमुख रावसाहेब रोहोकले यांनी व्यक्त केली.
त्याचप्रमाणे पदवीधर, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख,विस्तार अंधिकारी प्रमोशन, वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव मंजुरी, स्थायित्व प्रमाणपत्र, आंतरजिल्हा बदलीने बदलून आलेल्या प्राथमिक शिक्षकांचे वेतन व इतर प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांबाबत देखील सकारात्मक भूमिका प्रशासनाने घेतली आहे.
हे सर्व प्रश्न लवकरच मार्गी लावले जातील असे क्षिरसागर यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले. यावेळी नेवासा तालुका प्राथमिक शिक्षक परिषदेचे तालुका अध्यक्ष दशरथ ढोले व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे वेतन वेळेवर व्हावे ही संघटनांची सातत्याने मागणी होती. या मागणीची दखल घेऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी प्राथमिक शिक्षकांचे वेतन सीएमपी प्रणालीद्वारे करण्याबाबतचा घेतलेला निर्णय तसेच जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी यांचे खाते सेंट्रल बँक ऐवजी स्टेट बँक येथे करण्याचा घेतलेला निर्णय निश्चित योग्य असून हा निर्णय घेतल्याबद्दल जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांच्या वतीने जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी तसेच अधिकारीवर्ग यांचे आम्ही मनापासून आभार मानत आहोत.
Post a Comment