ऊंचच ऊंच कातळाचा सुळका आणि साधारण 60 अंशमधील चढण हे आणखी भयावह वाटावे असे बेदरकारपणे वाहणारे वारे हे सगळे भीतिदायकच होते. पण पाईप क्रॉसिंग इतके नाही त्यामुळे भीती जरा कमीच वाटली.
काही क्षण विश्रांती घेऊन बालेकिल्ल्याकडे चढाई चालू झाली. जसा बालेकिल्ला जवळ आला तसा आणखी एक अवघड पेच समोर आला पण अगदी थोडासा. जरी थोड़ा होता तरी वारे आणि पाऊस यामुळे तो ही त्याचा झटका दाखवत होताच. हे सगळे अग्निदिव्य पार करून बालेकिल्ल्याच्या पठारावर पाय ठेवतच होतो की आमचे स्वागत केले.
ते थंडगार सुसाट वारे आणि पाण्याने भरगच्च भरलेल्या ढगांनी त्यामुळे कासराभर लांब दिसायचे ही वांदे झालेले. त्यात आमच्या काही मित्रांनी त्यांचे सेफ्टी हार्नेस काढून खालच्या मित्रांसाठी दिलेले. त्यामुळे त्यांना त्या वाऱ्यापावसात थांबण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे ते खुपच गारठलेले दिसले त्यांचे ते केविलवाणे रूप पाहून बाकीचे सहकारी बालेकिल्ला पहायच्या फंदात पडलेच नाहीत.
हेच आमचे त्या दिवसाचे सर्वात मोठे दुर्दैव इतका सारा हट्टाहास करून १५ ऑगस्टला श्री मलंग गडाच्या बालेकिल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकायचा आमचा इरादा अगदी जवळ येऊन हुकला होता.
शिवाय बालेकिल्ला ही दिसला नाही ज्याचे खुप वाईट वाटले. पण म्हणतात ना हेही इसे थोडके या उक्ती प्रमाणे आम्हास सगळे मिळाल्याचा आनंद झालाच होता.
आता बालेकिल्ल्याचा डोंगर उतरून खाली त्या ठिकाणी आलो. जिथे आम्ही पाईप क्रॉस करून आलो होतो. पण आता एक चांगली गोष्ट होती. ती म्हणजे पाईप क्रॉस न करता रैपलिंग करून आम्ही सोनमाचीवर उतरणार होतो.
या आधी भैरवगडावर रैपलिंग केले असल्यामुळे यावेळी रैपलिंगचा आनंद घेत घेत खाली उतरलो. यावेळी माझा पहिला नंबर होता (आमच्या पाच पैकी). त्यामुळे मी खाली गेल्यावर सर्वांचे फोटो शूट करायचे असे ठरलेले. मी खाली येऊन मोकळा श्वास घेतच होतो की वरुन अभिजीत निम्म्यावर खाली आला होता.
कारण उशीर झाल्याने दोन रैपलिंग स्टेशन लावले होते. पटकन बॅग खाली ठेऊन मोबाईल काढला आणि बॅगेची चेन न लावताच बॅग खाली ठेऊन दिली. वीडियो काढण्यात मग्न झालो, इतका की अभिजित खाली पोहचल्यावर बोलला साहेब तुमची बॅग...... " मागे पाहतो तर माझी सगळी बॅग उचकली होती आणि तिच्यातले उरलेले खाण्याचे पदार्थ पळवले होते. नशीब माझे मी बॅगेची चेन लावली नव्हती नाही तर मला बॅगेवर पाणी सोडायचीच वेळ आली होती.
आता आम्ही सगळे बालेकिल्ला उतरून सोनमाचीवर आलो होतो तर...विशाल सरांच्या भुकेने उचल खाल्ली. त्यामुळे तिथे मोसंबी खाण्याचे ठरले. मोसंबी सोलून होईपर्यंत तिथे दुपारचे पाहुणे हजर झाले. मग काय आम्ही सगळे विशाल सरांच्या कडेने काठया घेऊन असे उभे राहिलो जणू काही गडावरचे भालदार चोपदार वाटावेत.
तिथले आवरल्यावर हळू हळू पिरमाचीच्या दिशेने खाली उतरायला सुरवात केली. एक एक पाऊल हळूवार टाकताना डावा पाय जरा हलकाच टाकत होतो. कारण पाईप क्रॉस करताना त्या पायाला जरा लागले होते. पण अचानक हलक्या पावलाने घात केला आणि असा काही सटकलो की क्षणात रापकन खडकावर आदळलो.
पण नशीब चांगले कारण सेफ्टी हार्नेस सोडलेले नव्हते. त्यामुळे पायाचा मांड्या आणि कंबर फिट बांधलेली होती. त्यामुळे कुठेही झटका बसला नव्हता. मग मात्र मी खुपच काळजी पूर्वक उतरत होतो, असा की म्हणतात ना दुधाने तोंड भाजल्यावर माणूस ताक ही फुंकुन पितो. अगदी तसाच. आता आम्ही पिरमाचीवर आलो होतो. पण आम्ही आलेल्या मार्गे न जाता पायऱ्यांच्या मार्गे उतरणार होतो. कारण आता आंधार पडायला लागला होता. (क्रमशः)

Post a Comment