नगर : प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेवर सध्या बंडखोर गुरुमाऊली गटाची सत्ता आहे. या सत्ताधारी मंडळाची मुदत मार्च महिन्यातच संपलेली आहे. परंतु सध्या कोरोना काळ असल्यामुळे या सत्ताधारी मंडळाला राज्य सरकारकडून अभय मिळाले आहे. याच संधीचा फायदा घेत सत्ताधारी मंडळी सभासदहिताच्या पोकळ गप्पा मारत आहे, असा आरोप शिक्षक परिषदेच्या उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष आर. पी. रहाणे यांनी केला आहे.
याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कोरोणा काळात शिक्षक बँकेच्या मागील आर्थिक वर्षात लेखा परिक्षण अहवालानुसार बारा आँनलाइन मासिक सभा झालेल्या आहेत. तसेच तीन विशेष सभा व एक वार्षिक सर्व साधारण सभा तीसुद्धा आभासी ऑनलाईन पद्धतीने झाली आहे. तरीही या सत्ताधारी संचालकांनी आपल्या तथाकथित नेत्याच्या मार्गदर्शनाखाली प्रवास भत्ता व मिटींग भत्यापोटी तब्बल 30,90,069 एवढा खर्च केल्यामुळे नेत्यासह संचालक मात्र मालमाल झाले असल्याचा आरोप रहाणे यांनी केला आहे.
या बँकेचे संचालक एकूण २१ असून झालेला खर्च तीस लाख नव्वद हजार एकोणसत्तर रुपये हा बारा महिन्याचा खर्च झालेला आहे. म्हणजे प्रति संचालक तब्बल 1,47,146 रुपये खर्च केलेला आहे . राज्यातील सर्व सहकारी बँका मध्ये शिक्षक बँक हि एकमेव बँक असेल कि, जिचे संचालक दर वर्षाला तब्बल एक लाख सत्तेचाळीस हजार एकशे शेहेचाळीस रुपये प्रवास भत्ता घेतात.
नावालाच फक्त सभासद हिताच्या गप्पा अन कर्तृत्वाच्या हात हात व्हॉटसप पोस्ट टाकणाऱ्या नेत्याने या गोष्टीचे आत्मचिंतन करावे नसता सगळा हिशोब येणाऱ्या निवडणुकीत सर्वसामान्य सभासद चुकता केल्या शिवाय राहणार नाहीत. कारण सामान्य सभासदांच्या दारात चुकीला व बनवेगिरीला माफी नसते.
शिक्षक बँकेत सध्या सुरु असलेल्या या अनागोंदी कारभाराविरोधात सर्व विरोधकांनी बोटचेपी भूमिका घेतली असली तरीही शिक्षक परिषद व रावसाहेब रोहोकले प्रणित गुरु माऊली मंडळाने वेळोवेळी प्रखर आवाज उठविला आहे. यापुढेही आमची भूमिका स्पष्ट व सडेतोड असेल, असा इशारा रहाणे यांनी दिला आहे.

Post a Comment