नगर : जिल्ह्यात आढळून आलेले डेल्टाप्लसचे चार रूग्ण हे जुनेच असून सध्या ते ठणठणीत बरे झालेले आहेत. कोरोना उपचार सुरू असताना जुलै महिन्यात जणूकीय तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या सॅम्पलपैकी चार जणांचे सॅम्पल डेल्टाप्लस पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आज प्राप्त झाला आहे. हे चारही रुग्ण बरे झालेले असून ठणठणीत आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जावू नये, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील ज्या चार जणांना डेल्टा प्लसची लागण झाल्याचा अहवार सध्या प्राप्त झाला आहे. ते चारही रुग्ण जुलै महिन्यात कोरोनाबाधीत होते. ते उपचार घेत असताना 16 ते २१ जुलैला त्यांचे सॅम्पल जिल्हा रुग्णालयाने जणूकीय तपासणीसाठी पाठविले होते. जिल्हा रुग्णालय १५ टक्के रुग्णांचे सॅम्पल अशा पद्धतीने जणूकीय तपासणीसाठी पाठवत असते. जुलै महिन्यात पाठविलेल्या सॅम्पलमधून चार जणांना डेल्टा प्लसची लागण झाली होती. असे सध्या प्राप्त झालेल्या अहवालानुसार स्पष्ट होते.
या चार रुग्णांमध्ये पारनेरच्या दोघांचा समावेश असून ते दोघेही पुरुष आहेत. त्यातील एकाचे वय ३ ९ तर दुसऱ्याचे वय ४१ आहे . तर श्रीगोंद्यातील डेल्टाप्लस रुग्णाचे वय २७ असून ती महिला आहे. पाथर्डीत आढळून आलेला एक १९ वर्षीय तरुण आहे . हे सर्व रुग्ण कोरोनाचे उपचार घेऊन ठणठणीत बरे झालेले आहेत.
हे सर्व रुग्ण जुने असून त्यांचे अहवाल महिनाभरानंतर आल्याने त्यांना डेल्टाप्लस झाला होता हे स्पष्ट होत आहे. डेल्टाप्लसचे रिपोर्ट नवे असले तरी रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेलेले असून नागरिकांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही. १५ टक्के कोरोना रुग्णांचे सॅम्पल घेऊन तपासणीसाठी पाठविणे ही नियमित चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे त्याचे रिपोर्टमुळे घाबरुन जावू नये, असे आवाहन आरोग्य विभातर्फे करण्यात आले आहे.

Post a Comment