नगर ः दिवसेंदिवस सेंद्रिय शेती काळाची गरज बनत आहे. पूर्वी नैसर्गिक पालेभाज्या शेतावर व बांधावर डोंगरावर मिळायच्या. परंतु त्या आता हे सर्व लोप पावल्याचे दिसते. पूर्वजांच्या आहारात सकस आहाराचे प्रमाण चांगले असल्याने त्यांचे आयुष्यमान जास्त असायचे. सध्याच्या फास्टफूडच्या जमान्यात शरीरास सकस आहार शरीराला न मिळाल्याने आजारांचे प्रमाण वाढून आयुष्मान घटले आहे. नवनवीन रोगांमुळे जीवनाची शाश्वती राहिलेली नाही, असे प्रतिपादन संदीप गुंड यांनी केले.
नगरला कृषी विभाग ‘आत्मा’च्या वतीने
रानभाजी महोत्सवप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी कृषी उपसंचालक विलास नलगे, ‘आत्मा’चे कृषी उपसंचालक राजाराम
गायकवाड, तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले, क्रांती चौधरी, श्रीकांत
जावळे, उमेश डोईफोडे, कौस्तुभ कराळे, नंदू घोडके, अपूर्वा तोरडमल, सुनीता
काळे, दीपाली दरेकर, जिवाजी लगड यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
गुंड म्हणाले की, निसर्गाने आपणास सर्व काही भरभरून दिले आहे. मात्र,
आपणास ते ज्ञात नाही. नव्या पिढीने याचा अभ्यास करावा. कृषी विभागाने
रानभाजी महोत्सवाच्या माध्यमातून जुन्या संस्कृतीला उजाळा दिला.
शेतकर्यांनी काळाची गरज ओळखून शेती करावी. जोपर्यंत शेतकर्यांच्या मालाचा
भाव शेतकरी ठरवत नाही, तोपर्यंत शेतकरी सुधारणार नाही, असे ते म्हणाले.
नलगे म्हणाले की, अंबाडी, पिंपळ, करटुले, करडू, गुळवेल, टाकळा, घोळ,
दिंडा अशा अनेक प्रकारच्या रानभाज्या आहेत. त्यापासून विटामिन मिळते.
आपल्याला आयुर्वेदाने मोठी देणगी दिली असून, त्याची आपल्याला पूर्ण माहिती
नसल्याने ती लोप पावत आहे. निसर्ग हा एक दैवी चमत्कार आहे. आयुष्यमान
वाढवायचे असेल, तर निसर्गाबरोबर चालायला हवे. वाढत्या वृक्षतोडीमुळे
निसर्गाचा समतोल बिघडत आहे, असे ते म्हणाले.
गायकवाड म्हणाले की, आरोग्यम् धनसंपदा हे ब्रीद प्रत्यक्षात यायला
हवं. याच उद्देशाने कृषी विभागाने ’आत्मा‘च्या माध्यमातून रानभाजी
महोत्सवाचे आयोजन केले. शेतकर्यांनी रानभाज्यांचे संवर्धन करून शेती
करावी.
रानभाज्या नैसर्गिक असल्याने त्या पूर्णपणे सेंद्रिय आहेत. हे औषधी
वनस्पतींचे भांडार आहे आपल्या आयुष्यातील हे कल्पवृक्ष आहेत. अन्न
प्रक्रिया व सुगंधी वनस्पती प्रक्रिया उद्योगासाठी शासनाचे 10 लाखाचे
अनुदान असून, त्याचा शेतकर्यांनी घ्यावा, असे ते म्हणाले.
पोपटराव नवले यांनी रान भाजी महोत्सव आयोजनामागील उद्देश विशद करून
सविस्तर मार्गदर्शन केले. क्रांती चौधरी यांनीही मार्गदर्शन केले.
सूत्रसंचालन संजय मेहेत्रे यांनी केले, तर उमेश डोईफोडे यांनी आभार मानले.

Post a Comment