अमर छत्तीसे
श्रीगोंदा तालुक्यातील राजकारण नेहमीच बदलत राहिलेले आहे. आजचा शत्रू उद्याचा मित्र असू शकतो" ही म्हण श्रीगोंदा तालुक्यात परिपूर्ण लागू होते. याचे ज्वलंत उदाहरण कालच्या उपसभापती निवडीत दिसून आले.
श्रीगोंदा तालुक्यात राजकारणा नेहमीच नाट्यमय बदल झालेले आहेत. अशीच परिस्थिती सभापती पदाच्या निवडीच्या वेळी झाली होती. पाचपुते गटाची सत्ता होती. सभापती पद आरक्षित झाले व सर्व गणितं बिघडली.
आघाडीच्या गटाने पाचपुते गटातील सदस्य आपल्या बाजूने घेऊन सभापती पदाचा झेंडा फडकावला. पण त्यानंतर उपसभापतीपदी असणार्या रजनी देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर पुन्हा आघाडीचा उपसभापती विराजमान होईल,असे आडाखे बांधले होते.
त्यानुसार आघाडीने फोडाफोडीचे राजकारण केले. पण त्यात त्यांना यश मिळू द्यायचे नाही, असा चंगच भाजपच्या नेत्यांनी बांधला होता.
या निवडणुकीत भाजपला खिंडीत गाठण्यासाठी जिल्ह्यातील आजी माजी आमदारांची फौज कामाला लागली होती. पण भाजपचे नेते माजी मंत्री तथा आमदार बबनराव पाचपुते, खासदार डॉ. सुजय विखे-पाटील, युवा नेते साजन पाचपुते ज्येष्ठ नेते लक्ष्मण नलगे, बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा, रमेश गिरमकर यांनी अहोरात्र प्रयत्न करुन भाजपचा झेंडा फडकावला.
यामध्ये ही निवड प्रक्रिया भाजपच्या एका नेत्याच्या कानावर घातली होती. संबंधित नेता दिल्ली दरबारी असताना देखील थेट संपर्क साधून येणाऱ्या अडचणींवर मात करत कोठारे उपसभापती झाल्या.
यामध्ये सर्वात महत्त्वाचा वाटा माजी सभापती शहाजी हिरवे, रजनी देशमुख, प्रतिभा झिटे, जिजाबाप्पू शिंदे, पुरूषोत्तम लगड, आशा गोरे, नाना ससाणे यांनी बजावली आहे.
देशमुख व शिंदे हे खासदार सुजय विखे पाटील यांना माननारे आहेत. विखे-पाटील यांच्या सूचनेनुसार या दोन सदस्यांनी बिनशर्त पाचपुते गटाला साथ दिली. त्यामुळे आघाडीकडे फक्त तीनच सदस्य उरले आहेत.
या एकंदरीत राजकीय घडामोडीवरुन तालुक्यात पाचपुते विखे पाटील यांची एक्सप्रेस सुसाट धावणार असल्याचे दिसून येते.

Post a Comment