नगर : शिक्षक बँकेच्या वार्षिक अहवालात भरमसाठ फोटो छापून संचालक मंडळाने त्याखाली आकडेवारी लपवण्याचा प्रयत्न केला असल्याची टीका गुरुकुल मंडळाने केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजकीय पदाधिकारी व संचालक मंडळाचे फोटो आवश्यक असले तरी सत्ताधारी मंडळाने संबंध नसलेल्या राज्य संघटनेच्या पदाधिकार्यांचे फोटो छापून अहवालाचा रंगीत आल्बम केला आहे.
कार्यकर्त्यांना खूश करण्यासाठी आधारस्तंभ, प्रेरणास्थान अशा गोंडस नावाखाली
जिल्ह्यातील अनावश्यक व्यक्तींच्या फोटोसाठी अहवालाची अनेक रंगीत पाने
वाया घालवली आहेत. या अतिरिक्त छपाईचा भुर्दंड सभासदांना बसला आहे.
बँकेचा
सभासद मयत झाल्यानंतर त्याचे संपूर्ण कर्ज माफ व्हावे यासाठी
जुन्याजाणत्या धुरिणांनी मयत निधी ठेव योजना सुरु केली. सत्ताधाऱ्यांनी मात्र या निधीतून जिवंत थकबाकीदारांचे कर्ज वसूल करण्याचा सपाटा सुरु केला. त्यासाठी या मयत निधीतून ८५ लाखाच्या वर रक्कम खर्ची टाकण्यात आली.
ज्या थकबाकीदारांचे कर्ज बँक भरते त्यातील अनेक शिक्षक शाळेवर गैरहजर आहेत. अनेक निलंबित तर काही बडतर्फ आहेत. काही शिक्षकांवर गुन्हे दाखल असून त्यांनी तुरुंगवासही भोगला आहे. यांच्या कर्जाची जबाबदारी बँक घेतेच कशी? त्यामुळे निधी कमी पडला व कोरोनाने मृत्यू झालेल्या शिक्षकांसाठी मयत निधीत वाढ करण्याची नामुष्की संचालक मंडळावर आली. यापुढे फक्त मृत्यू झालेल्या शिक्षकांचे कर्ज या निधीतून फेडले जावे म्हणजे वेळोवेळी मयत वाढ करण्याची गरज पडणार नाही.
बँक शताब्दीच्या नावाखाली या संचालक मंडळाने एक कोटीची तरतूद केली होती. त्यातील शिल्लक रक्कम १ लाख ७८ हजार रुपये दाखवण्यात आली आहे. निधी वाढवून
सभासदांच्या खिशात हात घालण्यापेक्षा हा निधी मयत निधीसाठी वापरता आला
नसता का ? ९८ लाख रुपयांचे नेमके काय केले याचा हिशेब संचालक मंडळाने
द्यावा.
आभासी पद्धतीने वार्षिक सभा होवूनही सभेचा ९ लाख रुपये खर्च कसा झाला ? अहवालात असे अनेक खर्च संशय निर्माण करणारे असून त्याची उत्तरे घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशारा शिक्षक नेते रा. या. औटी, संजय धामणे, सुदर्शन शिंदे, नितीन काकडे, वृषाली कडलग, इमाम सय्यद, संतोष भोपे, शिवाजी रायकर, सुखदेव मोहिते, बाळासाहेब खेडकर, मिलिंद पोटे, अशोक कानडे, वैभव दिघे, सागर घालमे, जालिंदर गोरे, अशोक आगळे, दशरथ पवार, उत्तम गायकवाड, सुभाष गोल्हार ,ज्ञानेश्वर बोडखे, सोमनाथ येलमामे, अनिल
ओहोळ, जालिंदर खाकाळ, शरद धलपे, बबन बनकर, सचिन झावरे, दत्तात्रय शिंदे, संतोष पालवे, संतोष डमाळ, सतीश अंधारे, सीताराम गव्हाणे, विलास गोरे यांनी दिला आहे.
विकास मंडळाच्या इमारतीचे काम अपूर्ण आहे. पुढच्या पिढीच्या हाती आपण असे सांगाडे देवून जाणार आहोत का? शिक्षक नेतृत्व अहंकारी नसावे. चांगल्या कामासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. सहकारात सहकार्यानेच कामे पूर्ण होतात. विकास मंडळाची इमारत पूर्ण करण्यासाठी शिक्षक ब्यांकेने मदत करावी. त्यासाठी गुरुकुल पुढाकार घेईल. - डॉ. संजय कळमकर, शिक्षक नेते

Post a Comment