चोरट्यांची आता किराणा दुकानांवर नजर... इतका मुद्देमालाची चोरी...

संगमनेर : सोने,चांदी व पैसे चोरीच्या घटना जिल्ह्यात अनेक घडलेल्या आहेत. मात्र आता संगमनेर तालुक्यासह जिल्ह्यात किराणा दुकानात अनेक चोरीच्या घटना घजत आहेत.


तालुक्याच्या पठारभागातील साकूर येथे चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. बुधवारी (दि.29) मध्यरात्रीच्या सुमारास साई किराणा मॉलचा पत्रा उचकटून चोरट्यांनी खाद्यतेलाचे डबे, रोख रक्कम, कॉस्मेटिक साहित्य तर समर्थ अ‍ॅग्रो मॉलमधून कांद्याचे बियाणे आणि रोख रक्कम चोरून पोबारा केला. 

शिंदोडी येथील उत्तम कुदनर यांच्या मालकीचे साकूर येथे साई किराणा मॉल आहे. नेहमीप्रमाणे ते मंगळवारी संध्याकाळी मॉल बंद करून घरी गेले होते. बुधवारी सकाळी मॉल उघडण्यासाठी आले असता कार लावण्यासाठी मॉलच्या पाठीमागे गेले तर त्यांना मॉलचा पत्रा उचकटेला दिसला.

घाबरलेल्या अवस्थेत मॉलमध्ये जावून पाहिले असता खाद्यतेलाचे डबे, रोख रक्कम, कॉस्मेटिक साहित्य, किराणा आदी साहित्य चोरी गेल्याचे दिसले. सीसीटीव्ही पाहण्यासाठी गेले तर चोरट्यांनी डीव्हीआरही चोरून नेल्याचे दिसले. 

या मॉलपासून जवळच असलेल्या दिलीप हरिश्चंद्र पेंडभाजे यांच्या समर्थ अ‍ॅग्रो मॉलचाही पत्रा उचकटून लाल व गावठी कांद्याचे बियाण्यासह रोख रक्कम चोरुन नेली.

या घटनेची माहिती घारगाव पोलिसांना समजताच पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल हरिश्चंद्र बांडे, प्रमोद चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

दरम्यान, चोरटे सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद होवू नये म्हणून चोरट्यांनी डीव्हीआरच लांबविला. यामुळे पोलिसांना चोरट्यांचा शोध घेणे आव्हान ठाकणार आहे. या चोरीच्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post