नगर ः गटशेतीच्या माध्यमातून शेतकर्यांना भविष्यात चांगले दिवस आहेत. गटशेती ही काळाची गरज आहे. राज्यात 1990पासून कृषी विभाग फलोत्पादन योजना राबवत असून, त्याचा चांगला फायदा शेतकर्यांना झालेला दिसतो. वैज्ञानिक युगात काळानुरूप बदल झालेले आहे. त्यानुसार शेतकर्यांनीही बदलायला हवे. गटशेतीला उज्ज्वल भविष्य आहे. फळबाग, ज्वारी, बाजरी करणार्या शेतकर्यांनी गटशेती करावी, असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले यांनी केले.
नेप्ती येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (सन 2021-22) अंतर्गत शेतकरी मेळावा व निविष्ठा वितरण कार्यक्रमप्रसंगी महाराष्ट्र राज्य सरपंच परिषद नगर जिल्हाध्यक्ष व हिंगणगावचे सरपंच आबासाहेब सोनवणे व तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले यांच्या हस्ते ज्वारी बियाण्यांचे शेतकर्यांना वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
या प्रसंगी नेप्तीचे उपसरपंच सुभाष जपकर, बाजार समितीचे माजी संचालक वसंत पवार, संजय जपकर, मंडळ कृषी अधिकारी सिद्धार्थ क्षीरसागर, शंकर खाडे, संभाजी गडाख, नितीन कदम, सौरभ जपकर, रामदास फुले, बी. आर. कर्डिले, शुभांगी काकडे, संतोष चौरे, अजय कर्डिले, जमीरभाई सय्यद, शुभम जपकर, बादशाह सय्यद, बाबूलाल सय्यद, लक्ष्मण कर्डिले, सागर कर्पे आदी उपस्थित होते.
नवले म्हणाले की, कृषी विभाग, शेतकरी व शेतकरी गटांनी एकत्र मिळून काम केले, तर शेतकर्याला निश्चितच मोठा फायदा होईल. कृषी विभागातील प्रत्येक घटक हा शेतकर्यांच्या पाठीशी उभा आहे. तळागाळाततील शेतकर्यांपर्यंत पोहोचण्याचे काम कर्मचारी करीत आहेत. विभागाच्या माध्यमातून प्रोसेसिंग युनिट अनुदान तत्त्वावर दिले जाते. त्याचा लाभ शेतकर्यांनी घ्यावा. आत्माच्या माध्यमातून डेअरी उत्पादनासाठी 30 लाखापर्यंत अनुदान तत्त्वावर योजना असून, 30 प्रकल्प कृषी विभागाच्या माध्यमातून सादर केले आहेत. नगर तालुका अकोळनेर मंडळात 17 ज्वारी प्रकल्प असून, एक प्रकल्प 10 हेक्टरचा आहे. एक प्रकल्पात 25 शेतकर्यांची निवड करण्यात आली आहे.

Post a Comment