नवी दिल्ली ः पितृपंधरवड्याचा सोन्याच्या भावाला चांगला फटका बसत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण सुरुच आहे. मागील आवठड्यापासून सोन्याच्या दरात घसरणच होत आहे. आज बाजारपेठ उघडल्यानंतर पुन्हा एकदा सोन्याच्या किंमतीत घसरण नोंदवण्यात आली.
मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) ऑक्टोबर डिलिव्हरीच्या सोन्याचा भाव 0.15 टक्क्यांनी घसरला आहे. चांदीच्या दरात 0.22 टक्क्यांची घसरण झाली आहे. यापूर्वी सोमवारी सोन्याच्या दरात किंचीत उसळी पाहायला मिळाली होती. मात्र ती जास्त काळ तग धरु शकली नाही. ऑक्टोबर वायद्याच्या सोन्याचा भाव 0.33 टक्क्यांनी वाढला होता.
आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती व रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत आज 45,280 रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत 45,240 रुपये प्रति 10 ग्रॅमवरवरच बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी 60,250 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याचे दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.
पितृपंधरवडा सध्या सुरु आहे. त्यामुळे या पंधरवड्यात नवीन वस्तूची खरेदी केली जात नसली तरी काहीजणांनी सोन्याचे दागिने तयार करण्याची नोंदणी नोंदवून ठेवलेली आहे. नवरात्रोत्सवात सोने घेऊन जाण्याचे नियोजनही काहींनी केलेले आहे. तशा नोंदणी काही सराफांकडे सध्या झाल्याचे दिसून येत आहे.
Post a Comment