एम. व्ही. देशमुख
नेवासा ः जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या हालचाली सुरु झालेल्या आहेत. निवडणुकीला अवधी असला तरी आता काहींची आपल्याला उमेदवारी मिळेल का की दुसऱ्या पक्षात जावे लागेल, याची चाचपणी सुरु झालेली आहे. मात्र नेवाशात सध्या राजकीय वातावरण थंड दिसून येत आहे.
विधानसभेची निवडणुकीत बाळासाहेब मुरकुटे यांचा परभाव करून आमदार शंकरराव गडाख यांनी विजय मिळविलेला आहे. या त्यांच्या विजयात माजी आमदार चंद्रशेखर घुले, माजी आमदार नरेंद्र घुले यांचा मोलाचा वाटा आहे. ही निवडणूक आमदार शंकरराव गडाख यांनी राष्ट्रवादी पुरस्कृत म्हणून लढविली होती.परंतु त्यानंतरत्यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीच्या जिल्ह्यात सध्या हालचाली सुरु झालेल्या आहेत. काही तालुक्यांमध्ये नेमके कोणते गटातून आपणला उमेदवार उभा करायचा याचे नियोजन आखण्यात येत आहे. मात्र नेवाशात आमदार शंकरराव गडाख व माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल लंघे, ज्येष्ठ नेते सचिन देसर्डा यांच्या गटात मात्र शांतता दिसून येत आहे.
जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये या पक्षातून त्या पक्षात जाणाऱ्यांची संख्या दिसून येत असून प्रवेश सोहळे होत आहे. मात्र नेवासा तालुक्यात अंतर्गत गटबाजी असूनही प्रत्येकजण आपल्याच पक्षात सध्या तरी दिसून येत असला तरी पक्षाच्या व नेत्यांच्या कार्यक्रमाला मात्र कोणी हजेरी लावत नाही तर कोणी जाऊन जास्त वेळ तेथे थांबत नसल्याचे दिसून येत आहे.
आमदार शंकरराव गडाख सध्या शिवसेनेत गेलेले आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी व काॅंग्रेस पक्षाची जिल्हा परिषद निवडणुकीसाठी काय भूमिका राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत आमदार शंकरराव गडाख यांनी एकहाती सत्ता मिळविलेली होती. आता ते शिवसेनेत असल्यामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेस व काॅंग्रेस एकत्र येऊ त्यांच्या विरोधात लढा देणार की तीनही पक्ष एकत्र येऊन भाजपाच्या विरोधात लढा देणार आहे, याची उत्सुकता सर्वांना लागलेली आहे.
भाजपाच्या गोटात सध्या शांतता दिसून येत आहे. तालुक्यातील भाजपाच्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांना माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे नेतृत्व मान्य नसल्याचे त्यांनी जाहीर केलेले आहे. त्यामुळे तालुक्यात भाजपाचे आगामी नेतृत्व नेमके कोणाचे राहिल, असा प्रश्न सध्या भाजपाचे कार्यकर्ते करीत आहे. सध्या आगामी विधानसभेचा उमेदवार म्हणून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठल लंघे व सचिन देसर्डा यांच्याकडे पाहिले जात आहे.
या दोन्ही नेत्यांनी आपल्या भूमिका अद्याप स्पष्ट केलेल्या नाहीत. त्यांचा जनतेशी संपर्क असला तरी तो कमी आहे. त्या तुलनेत माजी आमदार बाळासाहेब मरकुटे यांचा तालुक्यात सध्या जोरदार जनसंपर्क अभियान सुरु असून रोज ते काही गावांमध्ये जाऊन धार्मिक व इतर कार्यक्रमांना उपस्थित राहून जनतेची प्रश्न जाणून घेत आहेत.
घुले बंधूंचा सध्या शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील
मतदारांच्या गाठीभेटीवर भर दिसून येत आहे. नेवासा तालुक्यातील राजकारणात ते
कशी भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment