महिलांनीच घातला महिलेला गंडा... 54 हजाराचे दागिने लांबविले...


नगर : औरंगाबाद ते पुणे एसटी बसमधून प्रवास करताना नगररोड येथे दोन अनोळखी महिलांनी प्रवासी महिलेचे 54 हजाराचे दागिने लांबविले. ही घटना (दि.15) रोजी दुपारी सव्वा एक वाजता घडली. 

याप्रकरणी शोभा विनायक ढोबळे (राहणार मिसरवाडी, औरंगाबाद) यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात त्या दोन महिलांविरूध्द फिर्याद दिली आहे.

ढोबळे यांच्या भावाच्या मुलाचे लग्न चंदननगर (पुणे) येथे आज (दि.16) रोजी असल्याने ढोबळे या त्यांची मोठी जाऊ तारामती लक्ष्मण ढोबळे व नातेच्या समवेत दि.15 रोजी सकाळी पावणे अकरा  वाजता औरंगाबाद बसस्थानक येथून जालना ते पुणे (बस क्र. एमएच 20, बीएल 4083) या बसने पुण्याला जाण्याकरीता निघाल्या.

लग्नात घालण्याकरीता त्यांच्याकडील नेकलेस, कानातील झुमके, बोरमाळ व सोन्याचे मनी असे दागिने त्यांनी त्यांच्या पर्समधील पाकिटात ठेवले होते. त्यांच्या जाऊ व नात या बसमध्ये समारेच्या सीटवर बसल्या होत्या. 

त्यांच्या शेजारी खिडकीच्या बाजूस एक इसम बसलेला होता. सदर बस ही घोडेगाव जवळ आली असता, त्यांनी त्यांची बॅग पाहिली त्यावेळी सोने ठेवलेले पाकिट व्यवस्थित होते.

बस दुपारी सव्वा वाजता घोडेगाव येथे आली असता, या बसमधून काही प्रवासी उतरले व काही प्रवासी बसमध्ये बसले होते. बसमध्ये बसण्यास जागा शिल्लक नव्हती. यावेळी दोन अनोळखी महिला तिथे आल्या. त्यांनी तोंडाला स्कार्प बांधलेले होते. 

एका महिलेने बसण्यासाठी थोडी जागा द्या, अशी विनंती केल्याने ढोबळे यांनी तिला सीटवर बसण्यासाठी जागा दिली.

दुसरी महिला तेथेच खाली बसली. शेजारी बसलेली महिला अंगावर रेलत होती. तेव्हा तिला सांगितले की, अंगावर रेलू नकोस. तेव्हा ती म्हणाली, ताई माझी तब्येत ठिक नाही. माझ्या हाताला मुंग्या येतात, असे म्हणून ती वेळ मारून नेत होती. 


बस नगर-औरंगाबाद रस्त्यावर एका पेट्रोलपंपाजवळ आली असता, शेजारी बसलेल्या दोन्ही महिला बसमधून उतरल्या. तेव्हा त्यांनी त्यांची पर्स तपासून पाहिली असता, पर्समध्ये सोन्याचे दागिने ठेवलेले पाकिट दिसून आले नाही, असे फिर्यादीत म्हटले आहे. 

सदर महिलेने तातडीने पोलिस ठाणे गाठत या प्रकरणाची फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलिस करत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post