एसटीचा प्रवास महागला...

मुंबई : इंधनाच्या दरात दरवाढ,  टायरच्या तसेच बसच्या सुट्या भागांच्या वाढलेल्या किमतींमुळे एसटी महामंडळाच्या तिजोरीवर भार पडलेला आहे. तो कमी करण्यासाठी एसटी महामंडळाने अखेर भाडेवाढ लागू केली आहे. एसटी महामंडळाने गेल्या तीन वर्षांनंतर पहिल्यांदाच 17.17 टक्के भाडेवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.  ही भाडेवाढ महामंडळाच्या सर्व प्रकारच्या प्रवासी वाहतूक सेवांना लागू होणार आहे. 


आज (सोमवार) मध्यरात्रीपासून ही भाडेवाढ होणार आहे. किमान पाच रूपयाने वाढणार आहे. महामंडळाने भाडेवाढ केली असली तरी रातराणी बसच्या तिकिटांचे दर पाच ते दहा रूपयांनी कमी करत रात्रीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा दिला आहे.

गेल्या तीन वर्षात इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. दिवसेंदिवस हे दर वाढत असले तरी एसटी महामंडळाने प्रवासी दर मात्र स्थिर ठेवले होते. अशा परिस्थितीतही एसटी महामंडळाने कुठल्याच प्रवासी वाहतुकीच्या दरात वाढ केलेली नव्हती. इंधनाच्या वाढत्या दराचा बोझा झेलत एसटी प्रवाशांच्या सेवेसाठी धावत आहे. 

वाढत्या इंधनाचा भार पेलत असताना दुसरीकडे महामंडळाच्या तिजोरीवरही त्याचा परिणाम जाणवू लागला असल्याने नाइलाजास्तव ही तिकिट दरवाढ करण्यात येत असल्याचे एसटी महामंडळाने म्हटले आहे. 

नव्या तिकिट दरवाढीनुसार साधी गाडी, शयन-आसनी, शिवशाही तसेच शिवनेरी व अश्वमेधच्या पहिल्या टप्प्यासाठी भाडेवाढ होणार नसून दुसऱ्या टप्प्यानंतर म्हणजेच सहा किमी नंतर तिकिटाच्या दरात वाढ होणार आहे. ही दरवाढ पाच रुपयाच्या पटीत असून 25 ऑक्टोबर 2021 च्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. 

ऐन दिवाळीत झालेली ही दरवाढ सर्वांच्या खिशाला कात्री लावणारी आहे. केंद्राने आता तरी डिझेल व पेट्रोलची दरवाढ कमी करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी होत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post