आ. लंके यांनी घेतले ग्रामिण रूग्णालयात उपचार...

पारनेर : सामान्य घरात जन्मलेल्या आमदार नीलेश लंके यांचे सामान्य राहणीमान नेहमीच चर्चेचा विषय ठरले असून  सोमवारीही त्यांच्या सामान्य राहणीमानाचा अनुभव टाकळीढोकेश्‍वर येथील ग्रामिण रूग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी तसेच रूग्णांनी घेतला. 


आ. लंके यांना सर्दी, खोकला  तसेच घशात तडतड होत असल्याने टाकळी ढोकेश्‍वर परीसराच्या दौऱ्यावर असताना थेट ग्रामिण रूग्णालय गाठून तेथील डॉ. लोंढे यांच्याकडून त्यांनी उपचार करून घेतले. त्यांच्या या भेटीची तालुक्यात चांगलीच चर्चा सुरू आहे. 

मतदारसंघातील जनतेने वर्गणी करून आ. लंके यांना विधानसभेत पाठविल्यानंतरच्या काळात आ. लंके यांचे साधे राहणीमान नेहमीच  चर्चेत राहिलेले आहे. 

महाविकास आघाडीची स्थापना झाल्यानंतर तीनही पक्षाच्या आमदारांना एका तारांकीत हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. तेथील तारांकीत सुविधा आमदार लंके यांना रूचल्या नाहीत. त्यांनी थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे त्याबाबत आपल्या कुचंबनेबाबत तक्रार केली होती. 

आमदारांसाठी देण्यात आलेल्या आमदार निवासातही आ. लंके पलंगावर न झोपता सतरंजीवर झोपतात. त्याचे व्हिडीओ यापूर्वीच व्हायरल झालेले आहेत. लंके यांच्या वडीलांच्या हंगे येथील साध्या घराचीही राज्यभर चर्चा झालेली आहे.

अलिकडेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हंगे येथे येऊन लंके यांच्या घरी भेट देत त्यांच्या कुटूंबियांशी चर्चा केली होती. विधानसभेचा निकाल जाहिर झाला. 

त्याच दिवशी लंके यांचा किरकोळ अपघात झाला होता. त्यानंतरही त्यांनी ग्रामिण रूग्णालयात उपचार घेत आमदार झालो तरी मी जमीनीवरच असल्याचे कृतीतून दाखवून दिले होते. 

नेहमीच सुरू असेलल्या व्यस्त कार्यक्रमांमुळे सोमवारी सकाळपासूनच आ. लंके यांना सर्दी खोकल्याचा त्रास जाणवत होता. घशातही तडतड होत होती. मात्र त्यांनी विश्रांती घेण्याचे सोडून आपल्या नियोजित कार्यक्रमांना सुरूवात केली. 

कार्यक्रमांदरम्यान टाकळी ढोकेश्‍वर येथील ग्रामिण रूग्णालयात जाऊन त्यांनी डॉ. लोंढे यांच्याकडून उपचार करून घेतले. डॉ. लोंढे यांनी आ. लंके यांचा  रक्तदाब तसेच इतर चाचण्या करून त्यांना सर्दी खोकल्याची औषधेही दिली. व्यस्त दिनक्रमात वेळेवर औषधे घेण्याचा सल्लाही डॉ. लोंढे यांनी यावेळी त्यांना दिला. 

उपचारासाठी गेलेल्या आमदार लंके यांनी तेथील रूग्णांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. लहानग्यांशीही चर्चा करीत त्यांना खाउ देखील दिला. 

रूग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ. लोंढे यांनी कोरोना काळात अतिशय परीश्रम घेतल्याचे आमदार लंके यांनी यावेळी आवर्जुन सांगितले. 

अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी रूग्णालयातील काही असुविधांची तक्रार केल्यानंतर सर्व तक्रारी लेखी स्वरूपात द्या,  आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post