मुंबई : शेतकर्यांचा आवाज दाबवण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.
गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकरी नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करत आहेत. मात्र, लखिमपूर खिरी येथे शेतकरी आंदोलनाच्या दरम्यान वेगळेच चित्र पाहायला मिळाले.
शेतकर्यांच्या आंदोलनात वाहने घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. याठिकाणी झालेल्या दंग्यात शेतकर्यांचा मृत्यू झाला आहे. यावर शरद पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली.
कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलना दरम्यान उत्तर प्रदेशातील लखिमपूर खिरी जिल्ह्यात घडलेल्या हिंसाचार प्रकरणाने देशाला हादरा दिला आहे. या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध होत आहे.
पवार म्हणाले, ज्या पद्धतीने शेतकर्यांवर हल्ला झाला. त्यावरून केंद्र सरकारची नियत दिसली आहे. आज तुमच्याकडे सत्ता आहे, म्हणून सत्तेचा गैरवापर करून तुम्ही शेतकर्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहात.
पण त्यात तुम्हाला यश मिळणार नाही. तुम्ही एक ते दोन दिवस असे करू शकाल. पण फार काळ हे चालणार नाही. याची प्रतिक्रिया उत्तर प्रदेशच नव्हे तर संपूर्ण देशातील शेतकरी तुम्हाला देतील, असे पवार म्हणाले.
उत्तर प्रदेशातील परिस्थितीची तुलना जालियनवाला बागेतील हत्याकांडाच्या परिस्थितीशी आहे, अशा प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या.
Post a Comment