अमर छत्तीसे
श्रीगोंदा ः ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लॅंटच्या उदघाटनापासून कोनशिला चांगलीच चर्चेत आलेली आहे. या कोनशिलेचा वाद आता पोलिस ठाण्यापर्यंत पोहचलेला आहे. आमदार पाचपुते यांनी आपला राग व्यक्त केल्यापासून ही कोनशिला चांगलीच चर्चेत आलेली आहे. आता ति कोणी तरी फोडल्याची तक्रार आता पोलिस ठाण्यात करण्यात आलेली आहे.
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी चार दिवसांपूर्वी शहरातील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे उदघाटन केले. या वेळी कोनशिलेवर आमदार बबनराव पाचपुते यांचे नाव खाली लिहिल्यामुळे त्यांनी आपला राग व्यक्त केला. या चुकीबद्दल आपण हक्कभंग दाखल करणार असल्याचे स्पष्ट शब्दात उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर दुसर्या दिवशी जिल्हा शल्यचिकित्सकांनी आमदार बबनराव पाचपुते यांची भेट घेत माफीनामा सादर केला.
त्यानंतर दुसर्या दिवशी ही वादग्रस्त कोनशिला कोणी तरी फोडल्याचे स्पष्ट झाले. याबाबत वैद्यकीय अधिकारी डाॅ. संघर्ष राजुळे यांनी श्रीगोंदे पोलिस ठाण्यात तक्रार दिलेली आहे. त्याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.
मात्र ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात येऊन तिच कोनशिला कोणी व का फोडली, याचा शोध घेणे आता गरजेचे बनलेले आहे. विशेष म्हणजे ग्रामीण रुग्णालयात सीसीटीव्ही बसविण्यात आलेले असून त्यामध्ये ही कोनशिला कोणी फोडली, हे स्पष्ट होऊ शकते, अशी चर्चा सध्या तालुक्यात सुुरु झालेली आहे.
ग्रामीण रुग्णालयातील कोनशिला प्रकरणाचा तिढा सुटण्याऐवजी आणखीच वाढत चालला असेच यावरून स्पष्ट होत आहे. चूक एकाची मनस्ताप अनेकांना भोगण्याची वेळ आता या कोनशिलेमुळे येऊ लागली आहे. त्यामुळे प्रथम कोनशिलेवर चुकीचे नाव कोरनार्य़ांवर कारवाई करावी मग पुढचा तपास व्हावा, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांमधून होत आहे.
Post a Comment