नगर : पोलिस सेवेतून निलंबित करण्यात आलेल्या सहायक पोलिस निरीक्षक सुनील लोखंडे याने श्रीरामपूरचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्यावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. ही घटना आज (गुरुवारी) सकाळी दहाच्या सुमारास घडली आहे. या घटनेत मिटके थोडक्यात बचावले आहेत.
डिग्रस (ता. अकोले) येथे एका निलंबित सहाय्यक पोलिस निरीक्षकाने जिल्हा नियोजन समितीच्या माजी सदस्याच्या मुलांना रिव्हॉल्वरचा धाक दाखवून डांबून ठेवले होते. याबाबत माहिती मिळताच पोलिस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता. या वेळी घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक मिटके घटनास्थळी पोहचले.
यावेळी मिटके यांनी आरोपीवर झडप घालून त्याच्याकडील रिव्हॉल्व्हर हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत गोळी सुटली व मिटके यांच्या जवळून गेली. यात ते थोडक्यात बचावले. यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक दिपाली काळे हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेमुळे राहुरी तालुक्यात एकच खळबळ उडाली असून तर्कवितर्क लढविले जात आहे.
दरम्यान आरोपी यांनी दोन दिवसांपूर्वी ज्यांची मुले डांबून ठेवली त्यांना संबंधितांना जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणीची मागणी केली होती. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. हा गुन्हा मागे घेण्यासाठी हे कृत्य केल्याची सध्या राहुरी तालुक्यात चर्चा सुरु आहे.
Post a Comment