कर्जत ः मागील दोन वर्षांपासून आमदार रोहित पवार यांनी विकासाचे एक ही मोठे काम केलेले नसून त्यांचा सोशल मीडिया, भिंतीवर आणि कागदावरच विकास सुरू आहे. सध्यातरी मतदारसंघात लहरी राजा - प्रजा आंधळी आणि अंधातरी दरबार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी टीका भाजपाचे दादा सोनमाळी यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर केली.
येत्या सहा महिन्यात मतदारसंघातील कामे पाहून माजी मंत्री राम शिंदे यांचे डोळे पांढरे होतील या वाक्याचा दादा सोनमाळी यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात खरपूस समाचार घेतला. सोनमाळी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आमदार रोहित पवार यांनी दोन वर्षात मतदारसंघात एक ही मोठे विकासकाम केले नाही. पूर्वीच मंजूर असलेली कामे सध्या सुरू आहेत. ती कामे सुद्धा नित्कृष्ट होत असल्याने त्यास जबाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
येत्या सहा महिन्यात मतदारसंघातील विकासकामे पाहून माजीमंत्री राम शिंदे यांचे डोळे पांढरे होतील, असे आमदार पवार म्हणत असताना तुमच्या कार्य पद्धतीमुळे जनतेचे डोळे पांढरे होण्याची वेळ निर्माण झाली आहे. त्यामुळेच आपण पोलीस बंदोबस्त घेऊन फिरत असल्याचे म्हटले आहे.
तालुक्याचे प्रमुख अधिकारी राज्याचे कॅबिनेट मंत्री शंकरराव गडाख कर्जत तालुक्याच्या दौऱ्यावर असताना उपस्थित राहत नाही. मात्र स्वतः आमदार आणि त्यांचे नातेवाईक मतदारसंघात असताना जातीने उपस्थित राहत असल्याची वस्तुस्थिती विशद केली. वास्तविक पाहता माजी मंत्री राम शिंदे व खासदार डॉ सुजय विखे यांच्या प्रयत्नातून अहमदनगर सोलापूर महामार्गाचे काम मंजूर झाले.
खातेदार आणि लाभार्थी यांच्या नुकसान भरपाईसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध झाला होता मात्र यामध्ये अनेक ठिकाणी काळंबेरं झाला असल्याचा आरोप नागरिकांनी केला. याबाबत खा सुजय विखे यांच्याकडे अनेक तक्रारी देखील करण्यात आल्या होत्या. तत्कालीन प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांच्या कार्यकाळातील संपूर्ण कारभाराची चौकशी करावी अशी मागणी दादासाहेब सोनमाळी यांनी केली.
शासकीय अधिकारी की राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ः सोनमाळीकॅबिनेट मंत्री तालुक्यात असताना कोणतेही प्रमुख अधिकारी त्यांच्या प्रोटोकॉलला उपस्थित होत नाहीत. मात्र रोहित पवार आणि त्यांचे कुटुंबीय मतदारसंघात असताना तेच सर्व अधिकारी त्यांच्या दिमतीला हजर राहतात. नेमके अधिकारी- अधिकारीच आहेत की ? राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे, असा गंभीर आरोप सोनमाळी यांनी प्रसिद्ध पत्रकात आमदार रोहित पवार यांच्यावर केला.
Post a Comment