राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची शरद पवारांनी बोलविली तातडीची बैठक



मुंबई
:  सध्या पावसाने राज्यात धुमाकूळ घातला आहे. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, आदी भागांत पावसाने हाहाकार उडवून दिला आहे. यामध्ये बळीराजाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची तातडीने बैठक बोलावली आहे.

या बैठकीमध्ये पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबतचा आढावा शरद पवार घेणार आहेत. तर दुसरीकडे या बैठकीत महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वॉर्ड रचनेत झालेल्या बदलामुळे आघाडीतील धुसपूसीवरही चर्चा होणार असल्याची राष्ट्रवादीच्या गोटात चर्चा आहे. सहा ऑक्‍टोबरला मुंबईतील पक्ष कार्यालयात ही बैठक होण्याची शक्यता आहे.

मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्राच्या अनेक भागांत सध्या महापूर, अतिवृष्टीने हाहाकार उडवला आहे. मराठवाड्यात तर सगळीकडे पाणीच पाणी अशी स्थिती निर्माण झालेली आहे. याच सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तातडीच्या बैठकीचे आयोजन केले आहे. 

या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री छगन भुजबळ, राजेश टोपे, धनंजय मुंडे, बाळासाहेब पाटील, दत्ता भरणे, संजय बनसोडे आदींसह इतर मंत्री उपस्थित राहणार असल्याचे समजते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post