नगर ः रावसाहेब पटवर्धन पतसंस्थेतील गैरव्यवहारप्रकरणी अटकेत असलेल्या चौघांचे जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश बी. एम. पाटील यांनी फेटाळले आहेत.
यामध्ये पतसंस्थेची अध्यक्ष लतिका नंदकुमार पवार, उपाध्यक्ष सुभाष विद्याधर रेखी व संचालक लक्ष्मण सखाराम जाधव, प्रकाश नथ्थू सोनवणे यांचा समावेश आहे. ठेवीदारांच्या पैशांचा अपहार केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेने आतापर्यंत चौघांना अटक केली आहे.
या चौघांनी जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर मंगळवारी जिल्हा न्यायाधीश बी. एम. पाटील यांच्यासमोर सुनावणी झाली. सरकारतर्फे अँड. अर्जुन पवार यांनी युक्तीवाद केला की, संचालकांनी ठेवीदारांच्या कोट्यवधी रूपयांचा अपहार केला असून हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा आहे. याचा सखोल तपास होणे गरजेचे आहे. या अपहाराचे लेखापरीक्षण झाले आहे.
यात संस्थेच्या संचालकांनी 65 कोटी 31 लाख 80 हजार 253 रुपयांचा अपहार केल्याचे समोर आले आहे. सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने चौघांचे जामीन अर्ज नामंजूर केले आहेत.
Post a Comment