भूमिअभिलेख अधिकारी महिलेस चार वर्षांची शिक्षा

नगर : दहा हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी भूमिअभिलेख विभागातील भूकरमापक अधिकारी ज्योती संदीप नराल-डफळ हिला न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये दोषी धरून चार वर्षे सक्तमजुरी व २० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी ही शिक्षा ठोठावली.

सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अर्जुन पवार यांनी काम पाहिले. नगर तालुक्‍यातील एका शेतकऱ्याने भूमिअभिलेख कार्यालयात जमिनीची पाच तुकड्यांत मोजणी करण्यासा

ठी अर्ज करून सरकारी मोजणी फी भरली होती. त्याप्रमाणे भूकरमापक अधिकारी ज्योती नराल यांनी मोजणी करून नकाशा संबंधित शेतकऱ्याला दिला होता. मात्र, मोजणीप्रमाणे पाच तुकड्यांत निशाणी नकाशाप्रमाणे प्रत्यक्ष जमिनीवर दिल्या नव्हत्या.

यासंदर्भात संबंधित शेतकऱ्याने नराल यांची भेट घेऊन प्रत्यक्ष जमिनीवर निशाणी देण्याबाबत विनंती केली असता, त्यांनी त्यासाठी पाच तुकड्यांचे प्रत्येकी दोन हजारांप्रमाणे एकूण दहा हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यावर संबंधित शेतकऱ्याने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नराल यांना लाचेची रक्कम पंचांसमक्ष स्वीकारल्यानंतर रंगेहात पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक श्‍याम पवरे यांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. 

या खटल्यात चार साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. त्यामध्ये तक्रारदार, तपासी अधिकारी व पंच साक्षीदार यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. 

या खटल्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महिला पोलिस नाईक संध्या म्हस्के व पैरवी अधिकारी सहायक पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण काशीद यांनी काम पाहिले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post