नगर : जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात विरोधी पॅनलकडे बोलण्यासाठी मुद्देच नसल्याने आणि त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकु लागल्याने ते वैफल्यग्रस्त झाले आहेत.कर्मचारी संघटना आणि संस्थेची निवडणूक या दोन वेगवेगळ्या बाबी असतानाही त्यांच्याकडून संघटनांमध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. विरोधकांचा प्रचार जरी भरकटत चालला असला तरी आम्ही मात्र संस्था व सभासद हिताच्या मुद्द्यावर ठाम राहणार असल्याची भूमिका सत्ताधारी जय श्री गणेश पॅनलचे नेते संजय कडूस यांनी स्पष्ट केली आहे.
जय श्री गणेश पॅनलच्या प्रचारादरम्यान ते बोलत होते. या प्रसंगी उमेदवार प्रशांत मोरे, विक्रम ससे, भाऊसाहेब चांदणे, राजु दिघे, डॉ.दिलीप डांगे, चंद्रकांत संसारे, ऋषिकेश बनकर, स्वप्निल शिंदे, श्रीम.ज्योती पवार, कल्याण मुटकुळे, सुधीर खेडकर, श्रीकांत देशमाने, काशिनाथ नरोडे, कैलास डावरे, योगेंद्र पालवे, अर्जुन मंडलिक, सुरेखा महारनुर, मनिषा साळवे आदी उपस्थित होते.
कल्याण मुटकुळे म्हणाले की, संस्थेत गेल्या ५-६ वर्षात केलेल्या पारदर्शी कामामुळे सर्व सभासदांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. त्यामुळेच विरोधी दोन्ही पॅनलला उमेदवार उभे करताना मोठी कसरत करावी लागली. एका पॅनलला तर २१ पैकी अवघे १२ उमेदवार उभे करता आले.
चिन्ह वाटप झाल्यावर जिल्हा भरातून माहिती घेतल्या नंतर त्यांना आपली अनामत रक्कम जप्त होईल याची जाणीव झाल्याने आपली गेलेली इभ्रत वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न म्हणून विरोधकांना पाठींबा देण्याची नामुष्की त्यांच्यावर आली आहे.
मुटकुळे म्हणाले की, जर एकत्र यायचेच होते तर अगोदर २-२ पॅनल केले कशाला ? हे न उलगडणारे कोडे आहे. नेते जरी विरोधकांबरोबर गेले असले तरी त्यांनी उमेदवारी अर्ज भरायला लावून ज्यांचा विश्वासघात केला ते उमेदवार मात्र आम्हाला पाठींबा देत आहेत.
या मुळे नैराश्य आलेले हे नेते काहीच काम नाही, कोणी विचारत नाहीत त्यामुळे ते बेतालपणे सोशल मिडीयावर ओरडून घसा 'कोरडा' करत आहेत, असा आरोप मुटकुळे यांनी केला आहे.
Post a Comment