जिल्हा रुग्णालयाला आग... तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक दोषी...

नगर : जिल्हा रूग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आग प्रकरणी तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांना दोषी धरून दाखल गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे. 


या आग प्रकरणी नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी समितीने डॉ. पोखरणा यांना आगीच्या घटनेस दोषी धरले आहे. तसा अहवाल पोलिसांना दिला आहे. 

सहा नोव्हेंबर 2021 रोजी जिल्हा रूग्णलयातील अतिदक्षता विभागाला आग लागली होती. या आगीत 14 जणांचा मृत्यू झाला होता. सरकारने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पोखरणासह सहाजणांवर कारवाई केली होती. 

याप्रकरणी पोलिसांनी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात डॉ. विशाखा शिंदे, परिचारिका सपना पठारे, आस्मा शेख, चन्ना आनंता यांना अटक करण्यात आली होती.

सरकारने विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केली होती. या समितीने घटनास्थळी भेट देवून नोंदी घेतल्या. जिल्हा रूग्णालयाशी संबंधित विविध विभागांना प्रश्नावली दिली होती, ती भरून घेत त्यावर विश्लेषण केले. 

या घटनेसंदर्भात समितीच्या सहा वेळा बैठका झाल्या. त्याचबरोबर अनेकांचे जबाब या समितीने नोंदविले होते. समितीने अहवाल सरकारकडे सादर केला होता. 

हा अहवाल प्राप्त होताच पोलिसांनी डॉ. पोखरणा यांना गुन्ह्यात वर्ग करून घेत अटक केली आहे. दरम्यान डॉ. पोखरणा यांनी अटकपूर्व जामीन घेतल्यामुळे त्यांची तत्काळ मुक्तता करण्यात आली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post