मागण्या मान्य झाल्याने संभाजीराजे यांचे उपोषण मागे....

मुंबई : राज्य सरकारने सर्व मागण्या मान्य केल्यानंतर अखेर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज उपोषण मागे घेतले आहे. तीन दिवसानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले आहे.   


राज्य सरकारने मागण्या मान्य केल्यानंतर खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी उपोषण मागे घेतले आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी संभाजी राजे यांची आझाद मैदानात भेट घेऊन त्यांच्या मागण्या मान्य केल्याचे लेखी उत्तर दिले. तसेच एकनाथ शिंदे यांनी या मागण्या सर्वांसमोर वाचून दाखवल्या.

एवढेच नव्हे तर संभाजीराजे यांनी केवळ सात मागण्या केल्या होत्या, आम्ही त्यात आणखी मागण्यांची भर घालून त्या पूर्ण केल्या आहेत. काहीच ठेवायचे नाही असा निर्णयच सरकारने घेतला असून या सर्व मागण्या मार्गी लावण्यात येत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. त्यानंतर संभाजीराजे यांनी उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व मंत्र्यांशी आणि मराठा समाजाच्या शिष्टमंडळाशी बोलून काही निर्णय घेतले. त्याची माहिती देण्यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री एकनाथ शिंदे, मंत्री अमित देशमुख, खासदार राहुल शेवाळे, खासदार श्रीकांत शिंदे यांनी आझाद मैदान गाठले. 

या मंत्र्यांनी सुमारे अर्धा तास संभाजीराजे यांच्याशी चर्चा केली. या नेत्यांच्या भेटीनंतर आणि सरकारने मान्य केलेल्या मागण्यांबाबत समाधान मानत संभाजीराजे यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post