भाजपाच्या सचिन पोटरे यांना राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून जिवे मारण्याची धमकी...

नगर : कर्जतला कुकडी प्रकल्पातून पाणी मिळावे यासाठी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे यांनी आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर भाजपचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकऱ्यांकडून जिवे मारण्याची धमकी दिली जात आहे. 


हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत, अशा आशयाचे निवेदन माजी मंत्री राम शिंदे व सचिन पोटरे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना दिले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, सचिन पोटरे हे भाजपचे काम करत असताना विरोधक या नात्याने सातत्याने आमदार रोहित पवार यांच्या चुकीच्या धोरणांवर व राजकीय भूमिकांवर टीका करतात. तसेच माजी मंत्री राम शिंदे यांनी त्यांच्या कार्यकाळात मंजूर केलेल्या सद्य स्थितीत अपूर्ण असलेल्या विकास कामांबद्दल पक्षातर्फे भूमिका मांडत असतात. 

त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पुढे घालून सातत्याने मोबाईलवर हॉटसअँपवर व प्रत्यक्ष अप्रत्यक्ष समोर आल्यावर देखील जिवे मारण्याच्या धमक्या देतात.या आधीही बहिरोबावाडील  राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांनी मला फेसबुक व्हॉटसअप व प्रत्यक्षात जिवे मारण्याची धमकी देऊन सोशल मीडियावर माझी बदनामी केली. 

या प्रकरणी कर्जत पोलिस ठाण्यात सचिन पोटरे यांनी तक्रार दिली होती. राजकीय दबाव असल्याने त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. याउलट नऊ मार्चला कर्जत येथे कुकडीचे आवर्तन सोडण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या विजेच्या व उसाच्या प्रश्नावर माजी मंत्री राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या मोर्चात सचिन पोटरे यांनी त्यांच्या भाषणात आमदार रोहित पवार यांच्या आई व वडील यांच्यावर अपशब्द वापरले म्हणून खोटी फिर्याद दिली.

आमदार रोहित पवार यांनी आपल्या अशा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे न राहता त्यांना योग्य ती समज द्यावी. कायदा हा सर्वांसाठी समान असतो. आपल्या मतदार संघातही लोकशाही पध्दतीने राजकारण आणि समाजकारण झाले पाहिजे. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या या कार्यकर्त्यांवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून माझ्या जिवीताला धोका निर्माण झाला असुन या संबंधित कार्यकर्त्यांवर प्रशासनाने 15 दिवसांत तडीपाराचे प्रस्ताव सादर करावेत. जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा. 

आमच्या जिवीताला धोका निर्माण झाला आहे.  यात आमच्या जिवितास काही बरेवाईट झाल्यास संबंधित राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना जबाबदार धरण्यात यावे व त्यासाठी आम्हाला आपल्याकडून संरक्षण मिळावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post