नवी दिल्ली : चीन आणि आग्नेय आशियासह युरोपातील काही देशांमध्ये वाढता कोरोनाचा संसर्ग पाहता भारत सरकार सावध झालं आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि आरोग्य सचिवांना पत्र लिहून सतर्क केले आहे.
कोरोना संपला असा विचार करून कोणत्याही राज्यातील प्रशासनाने बेफिकीर राहू नये, असं भूषण यांनी पत्रात म्हटलं आहे. राजेश भूषण यांनी आपल्या पत्रात सर्व राज्यांना सावध राहण्यास आणि पंचसूत्रीचं पालन करण्यास सांगितलं आहे. चाचणी, ट्रेसिंग, उपचार, संपूर्ण लसीकरण आणि कोविड प्रतिबंधक उपाययोजना अवलंबण्यास सांगितलं आहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत गेल्या चोवीस तासात ७३ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. दिलासादायक म्हणजे गेल्या चोवीस तासात शुन्य मृत्यूची नोंद झाली आहे.
दिल्लीत गेल्या चोवीस तासात 148 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. आता दिल्लीत एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 610 इतकी आहे.
कोरोनाच्या संख्येत घट झाल्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाशी संबंधित सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशातील जलतरण तलाव, विवाहसोहळे आणि अंगणवाडी केंद्रांवरील निर्बंध हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Post a Comment