पोटहिस्से भोवले... दोघांना लाच घेताना रंगेहाथ पकडले...

कर्जत : जमिनीची मोजणी केल्यानंतर त्यातील तिन्ही खातेदार यांचे पोटहिस्से करुन हद्दीच्या खुणा दर्शविण्यासाठी 20 हजार रुपयांची लाच घेताना कर्जतच्या भूमिअभिलेख कार्यालयातील दोघ अधिकार्यांना नगरच्या लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी (दि.3) दुपारी रंगेहाथ पकडले आहे.


भूमीअभिलेख कार्यालयातील मुख्यालय साहाय्यक सुनील झिप्रू नागरे (रा.भैलुमे चाळ, शिवपार्वती मंगल कार्यालयाच्या जवळ, कर्जत) व भु-कर मापक कमलाकर वसंत पवार (वय 52, रा.शारदा मंगल कार्यालयाशेजारी, शाहूनगर, केडगाव) असे लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या अधिकार्यांची नावे आहेत.

कर्जत तालुक्यातील माहीजळगाव शिवारात असलेल्या जमिनीची कर्जतच्या भूमीअभिलेख कार्यालयाकडून मोजणी करण्यात आली होती. मोजणीनुसार तिनही खातेदारांचे पोटहिस्से करुन हद्दीच्या खुणा दर्शविणार्याकरीता या दोघांनी तक्रारदाराकडे 25 हजाराची लाच मागितली.

तडजोडीअंती 20 हजाराची रक्कम निश्चित करण्यात आली. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपक प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. गुरुवारी (दि.3) लाचलुचपत विभागाचे पोलिस उपअधीक्षक हरीष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. शरद गोर्डे, पो.ना.रमेश चौधरी, वैभव पांढरे, रवींद्र निमसे, हारुण शेख, राहुल डोळसे आदींच्या पथकाने कर्जत येथील भूमीअभिलेख कार्यालयात सापळा लावून दोघा आरोपी लोकसेवकांना तक्रारदाराकडून 20 हजाराची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. या दोघांवर कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई दुपारी उशिरापर्यंत सुरू होती.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post