अमर छत्तीसे
महिला सक्षमीकरण या मुद्यावर मोठ्या प्रमाणात चर्चा होते. पण प्रत्यक्षात महिलांना त्यांचे अधिकार वापरण्यासाठी सर्वाधिकार दिले तरच महिला सक्षमीकरण होऊ शकते.
माझ्या माहेरकडे स्थानिक पातळीवर राजकारणात सक्रिय कुटुंब होते. वडिल माणिकराव लोंढे हे गावचे सरपंच तर होतेच पण विद्यमान सोसायटी अध्यक्ष आहेत. माझ्या लहानपणापासून कुटुंबात राजकारण होते पण विवाहानंतर पती जास्त राजकारणात सक्रिय नव्हते.
पण नंतर गावच्या ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच झाले व माहेरचा वारसा सासरी ही सुरू झाला. राजकारण पुन्हा एकदा सुरू झाले. त्यानंतर पती रमेश गिरमकर हे स्वतः चा व्यवसाय व कुटुंब पाहण्यात मग्न असताना अचानक जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारी करण्यासाठी माजी मंत्री व विद्यमान आमदार बबनराव पाचपुते, स्वर्गीय सदाशिव पाचपुते, ज्येष्ठ नेते लक्ष्मण नलगे यांनी आग्रह धरला.
त्यामुळे मला उमेदवारी करण्याची संधी दिली. या दिलेल्या संधीचे नक्कीच सोने केले. माजी मंत्री व विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली गटाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटीबद्ध राहिले.
महिलांना स्वयंभू होणे गरजेचे आहे. महिला निर्णय घेताना अतिशय सक्षम आहेत. हे मी माझ्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत दाखवून दिले आहे. महिला सक्षम असेल तर कल्पना चावला सारख्या घडू शकतात. राजकारणात ही किरण बेदी, स्वर्गीय सुषमा स्वराज यांच्यासारख्या नेत्यांनी अतिशय सक्षमपणे देशासाठी काम केले आहे.
पूर्वीच्या काळात चूल आणि मुल एवढीच स्त्रीची व्याख्या होती. पण २१व्या शतकात महिलांनी ही व्याख्या बदली आहे. आज महिला सक्षमपणे उभ्या आहेत. मला माझ्या राजकीय जीवनात पती रमेश गिरमकर यांची मोलाची साथ लाभली आहे. ते अतिशय सक्षमपणे पाठिशी असल्यामुळे मी जिल्हा परिषदेत चांगले काम करु शकले.
तरीही महिलांवर पुरुष प्रधान संस्कृतीचा आजही पगडा दिसत आहे. ही मोठी शोकांतिका आहे, असे पंचशीला गिरमकर म्हणाल्या.
Post a Comment