बीड : भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीसोबत सत्तेत आहोत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना या सरकारमध्ये यायचे नव्हते. मात्र भाजपला सत्तेपासून दूर करायचे होते. त्यामुळेच आम्ही यांच्यासोबत आलो. त्यामुळेच सोनिया यांनी सांगितले होते की, आम्हाला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री नको, पण पहिल्याच अधिवेशनात शेतकरी कर्जमाफी झाली पाहिजे, अशी अट घातली होती, असं विधान नाना पटोले यांनी बीडमध्ये आयोजित कार्यक्रमात केले.
बीडच्या गेवराईत आज चौदावे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलं होतो. या कृषिप्रदर्शनाचे उद्घाटन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कृषिप्रदर्शनाला कृषी उपयोगी यंत्र व शेतीउपयोगी साहित्य याचे स्टॉल या ठिकाणी लागलेले आहेत.
या स्टॉलची नाना पटोले यांनी पहाणी करत, ट्रॅक्टरवर बसत शेतकऱ्याचा सत्कार देखील केला. या कार्यक्रमात ते बोलत होते. महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये नाराजी असल्याच्या बातम्या दर महिन्याला समोर येत आहेत.
कधी शिवसेनेचे आमदार विकास कामांसाठी निधी मिळत नसल्याने नाराज असल्याच्या बातम्या येतात, तर कधी काँग्रेस मंत्री राज्यातील महत्त्वाचे निर्णय घेण्यात काँग्रेसला गृहित धरलं जात नाही, पुरेसा निधी मिळत नाही, या तक्रारीने नाराज असल्याच्या बातम्या समोर येतात.
महाविकास आघाडीतील ही धुसफूस अद्यापही कमी झालेली नाही. विशेष म्हणजे ही धुसफूस अजूनही तशीच धगधगती असल्याचं चित्र आहे. कारण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या एका विधानावरुन काँग्रेस सरकारमध्ये सहभागी असूनही समाधानी नसल्याचं जाणवत आहे.
Post a Comment