नवी दिल्ली : पेट्रोल व डिझेलच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे.
गेल्या वर्षी तीन नोव्हेंबर 2021ला केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 10 रुपये व डिझेलवरील उत्पादन शुल्क 5 रुपयांनी कमी केले होतं. त्यानंतर देशभरात पेट्रोल व डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही.
उत्तर प्रदेश, पंजाबसह 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकांमुळे दरात वाढ झाली नसल्याचं मानलं जात आहे. आता सात मार्चला निवडणुकांची सांगता व 10 मार्चला निकाल यामुळं पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ होण्याची भीती लोकांमध्ये आहे.
रशिया-युक्रेन युद्धामुळे जगाची चिंता वाढली आहे. अशातच दोन देशांतील युद्धामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. ब्रेंट क्रूड ऑईलची किंमत 139 डॉलर्स प्रति बॅरलवर पोहोचली आहे.
2012 नंतर प्रथमच कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका उडाला आहे. असं असलं तरी देशात मात्र गेल्या चार महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत.
सध्या कच्च्या तेलाच्या किमतीत होणारी वाढ पाहता पेट्रोल आणि डिझेलमध्ये प्रति लिटर 10 ते 12 रुपये दर वाढ होणार हे नक्की. पण, दर एकाच वेळी वाढवणार का दररोज 2 ते 3 रुपयांनी वाढणार हे सांगता येणार नाही.
ते निर्णय कंपनी घेतील अशी प्रतिक्रिया फामफेडाचे अध्यक्ष उदय लोध यांनी दिली आहे. त्यामुळे पेट्रोलच्या किंमतीमध्ये वाढ होणार हे आता स्पष्ट झालं आहे.
Post a Comment