नगर : सध्या उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने पूर्वी प्रमाणे एप्रिल महिन्यात प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याचा निर्णय तातडीने घ्यावा अशी मागणी गुरुवारी (ता. ३१) नगर जिल्हा शिक्षक समन्वय समितीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांच्या कडे केली.
शिक्षक समन्वय समितीचे डॉ. संजय कळमकर, राजेंद्र शिंदे, राजेंद्र निमसे, आबा लोंढे, सुभाष तांबे, सुदर्शन शिंदे, भास्कर नरसाळे, नाना गाढवे, मधुकर मैड, अतूल काकडे, दगडू महांडूळे आदींनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांची गुरुवारी (दि. ३१) भेट घेतली. यावेळी शिक्षणाधिकारी भास्कर पाटील हे ही उपस्थित झाले.
सध्या विद्यार्थ्यासाठी सकाळच्या सत्रात शाळा भरवणे किती आवश्यक आहे यावर सविस्तर चर्चा झाली. मार्च-एप्रिल महिना आला की उन्हाचा चटका, पाणीटंचाई, शाळांमध्ये सुविधांचा अभाव, पत्र्याच्या चटके देणाऱ्या शाळा अशा कारणांनी मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. यासाठी पूर्वी
पासून नगर जिल्ह्यात लहान मुलांच्या जिल्हा परिषद शाळा एप्रिल महिन्यात सकाळ सत्रात भरविल्या जातात. गेली दोन वर्ष कोरोनामुळे शाळा बंद होत्या. परिणामी मुलांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने परिपत्रक काढून एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण वेळ शाळा भरवाव्यात असे आदेश केले आहेत.
रविवारी देखील ऐच्छिक शाळा भरवाव्या असे निर्देश दिले आहेत. असे असले तरी उन्हाची तीव्रता वाढली असून उकाडाही प्रचंड वाढला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा शिक्षक समन्वय समितीने सकाळ सत्रातच शाळा भरवा अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांच्याकडे केली आहे. याबाबत लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी समितीला दिले आहे.
Post a Comment