नगर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील विविध स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने आंतराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आठ मार्च ते आठ एप्रिल या कालावधीत आरोग्य सेवा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
या कालावधीत जिल्हा परिषदेतील महिल कर्मचाऱ्यांच्या विविध आरोग्य तपासण्या केल्या जाणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी दिली.
डॉ. सांगळे म्हणाले, या उपक्रमात असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सर्व महिलांची आरोग्य तपासाणी करण्याकरीता विविध उपक्रम घेण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थामध्ये असंसर्गजन्य आजारांकरीता उच्च रक्तदाब, मधुमेह, स्तनाचा कॅन्सर, मुखाचा कॅन्सर, गर्भाशय पिशवीच्या तोंडाचा कॅन्सर, हिमोग्लोबिन आदी तपासण्या करण्यात येणार आहेत.
त्याचप्रमाणे आजाराबाबत समुपदेशनही करण्यात येणार आहे. महिला कर्मचऱ्यांनी या आरोग्य तपासणी शिबिरात सहभाग घेऊन आपली तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, उपाध्यक्ष प्रताप शेळके, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांनी केले आहे.
या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी आरोग्य समितीचे सभापती प्रताप पाटील शेळके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) संदिप कोहीणकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी मनोज ससे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी मार्गदर्शन केले आहे, असे डॉ. संदीप सांगळे यांनी पत्रकात नमूद केले आहे.
Post a Comment