पारनेर : के. के. रेंज या लष्कराच्या रणगाडा प्रशिक्षण केंद्राच्या हद्दीत फिरण्यासाठी दोघेजण गेले होते. या प्रशिक्षण केंद्रात रणगाड्यातून मिस फायर झालेला एक जीवंत बॉम्ब पडलेला होता. या दोघांनी हा जीवंत बॉम्ब उचलून घराकडे घेऊन आले. या बॉम्बमुळे दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ढवळीपुरी (ता. पारनेर) येथील अमित संतोष गोंधळे आणि जयराम चौधरी हे दोघे गावाशेजारी असलेले के. के.रेंजमध्ये फिरायला गेले होते. त्यावेळी त्यांना जीवंत बॉम्ब सापडला. तो घेऊन घराकडे आले.
जीवंत बॉम्ब कोठे ठेवायचा असा त्यांच्यासमोर प्रश्न निर्माण झाला. त्यांनी शेतामध्ये खड्डा खोदून हा बॉम्ब पुरून ठेवला. याबाबतची गावात चर्चा सुरू झाली. जागरूक ग्रामस्थांनी ही माहिती पारनेर पोलिसांना दिली.
पारनेर पोलिसांनी या प्रकरणी तपास करून लष्करी अधिकाऱ्यांना माहिती दिली. लष्करी अधिकारी, बॉम्ब शोधक पथक व पोलिस यांच्या संयुक्त पथकाने ढवळीपुरीत दाखल झाले. बॉम्ब शोधक पथकाने संबंधित शेतात जाऊन अत्याधुनिक मशिनरीच्या सहाय्याने बॉम्बचा शोध घेतला.
शेतामध्ये जीवंत बॉम्ब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी या बॉम्ब शोधून नष्ट केला. लष्करी अधिकाऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात आरोपी अमित संतोष गोंधळे व जयराम चौधरी या दोघांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक गांगर्डे पुढील तपास करीत आहेत.

Post a Comment