राहुरी : येथील वायएमसीए मैदानावर १४ ते १८ एप्रिलच्या दरम्यान राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे शरद कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी दिली.
तनपुरे म्हणाले की, स्पर्धेच्या युगामध्ये आधुनिक पद्धतीने शेती केली, तरच शेतकरी टिकेल. सातत्याने पडणारा दुष्काळ, अवकाळी पाऊस, हवामानामध्ये होणारे बदल, यामुळे शेती व्यवसाय अत्यंत धोक्यात आला आहे.
या दुष्टचक्रातून आपला शेतकरी वाचला पाहिजे व त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली पाहिजे, तरच तो स्पर्धेच्या युगामध्ये टिकेल. त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील शेतकरी हा मुख्यतः ग्रामीण भागांमध्ये राहतो.
या दृष्टिकोनातून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने कृषी क्षेत्राचे भविष्य बळकट करण्यासाठी कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.
या प्रदर्शनामध्ये दीड टन वजन व एक कोटी किंमत असलेला गजेंद्र रेडा शेतकऱ्यांसाठी पाहण्यासाठी उपलब्ध राहणार असून, सदर प्रदर्शनांमध्ये सहभागी शेतकऱ्यांसाठी लकी ड्रॉचे आयोजन केले आहे. पाच दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

Post a Comment