नगर : समाधानकारक भाव भेटत नसल्याने शेतकरी पुरता मेटाकुटीला आला असून, शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू दाटले आहेत. त्यामुळे कांद्याचे भाव वाढण्याच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. तसेच कांद्याला अनुदान मिळावे अशी अपेक्षा कांदा उत्पादक शेतकर्यांमधून होत आहे.
सध्या कांद्याच्या भावात दिवसेंदिवस घसरण होत आहे. त्यामुळे कांदा उत्पादनावरील झालेला खर्च फिटणे देखील मुश्कील झाले आहे. मागील वर्षी कांद्याला समाधानकारक भाव मिळाला होता.
यावर्षी देखील समाधानकारक भाव मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड केली होती. परंतु, ऑगस्ट महिना उजाडला असून देखील कांद्याला समाधानकारक भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
भविष्यात देखील कांद्याचे भाव वाढतील की नाही? याबाबत साशंकता आहे. त्यामुळे राज्य सरकारने कांद्याला क्विंटल मागे 300 रुपयांचे अनुदान द्यावे, अशी मागणी होत आहे. या अनुदानामुळे कांदा उत्पादकांना आर्थिक आधार होणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.
Post a Comment