ही संस्था औषध फवारणी करण्यासाठी ड्रोन खरेदी करणार...

निघोज : सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या विकासासाठी निघोज परिसर कृषी फलोद्यान सहकारी संस्था प्रथमपासूनच प्रयत्नशील असून संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब कवाद यांचा आशिर्वाद व प्रेरणा घेऊन या संस्थेच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही संस्थेचे माजी चेअरमन रामदासशेठ वरखडे यांनी दिली आहे. 


निघोज परिसर कृषी फलोद्यान सहकारी संस्थेची २४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार १८ सप्टेंबरला फलोद्यान संस्थेच्या फॉर्महाउस कार्यालयात संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. संस्थेचे उपाध्यक्ष अमृताशेठ रसाळ या वार्षिक सभेच्या अध्यक्षस्थानी होते. 

प्रारंभी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब कवाद,माता मंळगंगा यांच्या प्रतिमेचे पूजन बाबासाहेब कवाद ग्रामविकास सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष शांताराम कळसकर, पारनेर तालुका पत्रकार संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक दत्ता उनवणे, शिवशक्ती पाणी वापर संस्थेचे चेअरमन खंडू लामखडे, निघोज सोसायटीचे चेअरमन सुनिल वराळ,व्हा.चेअरमन वसंतराव ढवण, ज्येष्ठ संचालक दामुशेठ लंके,भाऊ रसाळ, प्रेस फोटोग्राफर संतोष पंदारे यांच्या हस्ते करण्यात आले. 

या सभेत अहवाल वाचन संस्थेचे सचिव रवींद्र रसाळ यांनी केले सर्व विषय सभासदांनी एकमताने मंजूर केले. यावेळी संस्थेच्या वतीने औषध फवारणीसाठी ड्रोन खरेदी करण्याचा प्रस्ताव माजी चेअरमन रामदासशेठ वरखडे यांनी मांडला.उपसरपंच माउली वरखडे व मंळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे विश्वस्त भास्करराव वराळ यांनी या ठरावाला सर्वानुमते अनुमोदन दिले. सभासदांनी टाळ्या वाजवून या प्रस्तावाला मंजुरी देत ठराव सर्वानुमते मंजूर केला. 


संस्थेचे माजी चेअरमन रामदासशेठ वरखडे यांनी यावेळी बोलताना सांगितले की संस्थेला १४ लाख ३३ हजार नफा झाला आहे. सभासद संख्या ३९८, भागभांडवल साडे चार लाख रुपये, माल खरेदी पावणेचार कोटी, माल विक्री ३ कोटी ८७ लाख, गांडुळ खत कल्चर विक्री ९७ हजार अशी अहवाल वर्षात प्रगती झाली असून  गेली २४ वर्षांपूर्वी ही संस्था शेतकऱ्यांच्या हितासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब कवाद यांनी सहकाऱ्यांच्या माध्यमातून स्थापन केली.

संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत लामखडे, उपाध्यक्ष अमृताशेठ रसाळ व संचालक मंडळाच्या अथक प्रयत्नातून ही संस्था उभी राहिली.जो उद्देश कवाद व पदाधिकारी यांनी ठेवला होता ती उद्देशपुर्ती झाली असल्याचे समाधान आहे.शेतकऱ्यांना आधुनिक शेती करता यावी, शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे, औषध,खते कमी दरात उपलब्ध करून कमी पाण्यात व कमी खर्चात शेती करता आली पाहिजे.

यासाठी संस्थेने गेली २४ वर्षात शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक मेळावे घेऊन संस्था स्थापनेचा उद्देश सफल केला आहे. नफा किती होतो किंवा विक्री किती होते यापेक्षा शेतकरी हित किती जपले जाते ही बाब महत्वपूर्ण आहे.यासाठी संस्था पदाधिकारी व संचालक मंडळ यांचे योगदान महत्त्वाचे आहे. 

आधुनिक शेती करण्यासाठी संस्थेने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या तसेच येत्या चार दोन महिन्यात निघोज परिसरातील शेतीला ड्रोन माध्यमातून औषध फवारणीसाठी ड्रोन खरेदी करण्याचा निर्णय या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांनी घेतला आहे.

जिल्हातील सहकारी संस्थेने ड्रोन खरेदी करण्याचा हा पहिलाच निर्णय आहे.अशाप्रकारे आधुनिक शेती करुन शेतकऱ्यांचा पैसा व श्रम कसा वाचेल असा निर्णय सभासद घेतात ही संस्थेच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब असल्याची माहिती वरखडे यांनी दिली आहे. 

यावेळी बाबासाहेब कवाद ग्रामविकास सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष शांताराम कळसकर, उपसरपंच माऊली वरखडे  आदिंचे भाषने झाली. त्यांनीही संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत लामखडे, उपाध्यक्ष अमृताशेठ रसाळ व संचालक मंडळ यांचे कौतुक करीत शेतकरी हिताचे निर्णय घेणाऱ्या संस्थेचे धन्यवाद व्यक्त केले. 

यावेळी प्रगतीशील शेतकरी राहुल रसाळ, फलोद्यान सहकारी संस्थेचे संचालक सुभाष पठारे, शंकर रसाळ, कुंडलीक थोरात,कचरु डेरे, संतोष कोल्हे, निघोज सोसायटीचे माजी चेअरमन अंकुश लोखंडे, युवा नेते रुपेश ढवण, प्रगतीशील शेतकरी विठ्ठलराव लंके, ज्येष्ठ कारभारी गवराम लंके, गणेश कवाद, निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे वरिष्ठ अधिकारी शांताराम सुरकुंडे, सुनिल तांबे, रामदास गाडीलकर आदी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी संस्थेला एका कंपनीच्या माध्यमातून ओहन मिळाला.सोडतीच्या माध्यमातून या मायक्रो  ओहनची लॉटरी पद्धतीने ड्रॉ  बाळासाहेब वरखडे महाराज यांच्या हस्ते काढण्यात आला.यामध्ये संस्थेचे ज्येष्ठ संचालक दामुशेठ लंके यांचे चिठ्ठीत नाव निघाले त्यांना समारंभपूर्वक उपसरपंच माऊली वरखडे व मंळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे विश्वस्त भास्करराव वराळ व मान्यवरांच्या हस्ते ओहनचे वाटप करण्यात आले . 

वार्षिक सभा यशस्वी करण्यासाठी सचिव रवींद्र रसाळ, दत्तात्रय वरखडे, शिवप्रसाद शेवाळे, देविदास लेंभे,संपत वैरागर यांनी परिश्रम घेतले. संस्थेचे उपाध्यक्ष अमृताशेठ रसाळ यांनी उपस्थित सभासद व मान्यवर यांचे आभार मानले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post