आर.आर. पाटलांनंतर नीलेश लंकेच !

पारनेर : आमची सगळी मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकतात. या देशात, राज्यात असा एक नेता होऊन गेला ज्यांची मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकली. त्यांचे नाव आर.आर. पाटील असल्याचे सांगत आता मी माझे भाषण बदलणार आहे. या राज्यात दोनच नेते आहेत  ज्यांची मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकली एक आर.आर.पाटील आणि दुसरे नीलेश लंके असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. 


आ. नीलेश लंके यांच्या पुढाकारातून काढण्यात आलेल्या मोहटादेवी यात्रेचा शुभारंभ खा. सुळे यांच्या उपस्थितीत मंगळवारी झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. 

यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, बाबाजी तरटे, सुवर्णा धाडगे, राजेश्‍वरी कोठावळे, पुनम मुंगसे, विक्रमसिंह कळमकर, पारनेरच्या उपनगराध्यक्षा सुरेखा भालेकर, सुदाम पवार, अ‍ॅड. राहूल झावरे, दादा शिंदे, बापूसाहेब शिर्के, अर्जुन भालेकर, संतोष वारे, राणीताई लंके, बाळासाहेब कावरे, अशोक घुले, कारभारी पोटघन, जितेश सरडे, सुभाष शिदे , सचिन पठारे, राजेंद्र शिंदे, बाळासाहेब दळवी, जगदीप साठे, चंद्रकांत मोढवे, अक्षय चेडे , बंडू गायकवाड , रमीज राजे ,सचिन पवार, योगेश मते, बाळासाहेब लंके, सचिन औटी, विजय औटी, भुषण शेलार, बाळासाहेब नगरे, श्रीकांत चौरे विलास सोबले यांंच्यासह असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. 

खा.सुळे म्हणाल्या, आ. लंके यांचे भाषण मी ऐकत होते, त्यावेळी प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावर एक अभिमान होता, आनंद होता. राष्ट्रवादी काँग्रेसने काही निर्णय चुकीचेही घेतले असतील, परंतू नीलेश लंके यांना तिकीट देण्याचा जो निर्णय घेतला हा निर्णय महाराष्ट्रातील सगळयात चांगला व योग्य निर्णय ठरला. चटई उचलणारा हा पहिलाच आमदार असेल. मी चटई उचलतो, मी सर्वसामान्य मायबाप जनतेचे काम करतो हे ते अभिमानाने सांगातात. 

खा. सुळे पुढे म्हणाल्या, आजच्या कार्यक्रमासाठी रूपालीताई येणार आहेत. इतरही नेते आहेत मी येण्याची गरज आहे का असे सोमवारी फोन करून विचारल्यावर चालणार नाही यावेच लागेल असे त्यांचे उत्तर आले. त्यांना मी थोडीशी घाबरते, कारण ते काय करू शकतात हे मी पाहिलेले आहे. त्यांना एखादी गोष्ट हवी असेल तर हा बाबा सोडतच नाही .

त्यांच्या भाषणात त्यांनी पाच हजार सायकलची मागणी केली. भाषणात फिरून फिरून सायकलवरच येत होते. एतका हा बाबा हट्टी आहे. त्यामुळे एकदाच काय निर्णय घेऊन टाकू. पुढील वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मतदारसंघातील विद्यार्थ्यांसाठी पाच हजार सायकल देण्यात येतील अशी घोषणा सुळे यांनी केली. 

देवदर्शनासाठी राणीताई आणि नीलेश लंके हे दोघेही जाणार आहेत. पहिल्या गाडीत राणीताई तर शेवटच्या गाडीत नीलेश लंके असतील. पुन्हा येताना प्रत्येक माऊली तीच्या घरी जाईपर्यंत लंके घरी जाणार नाहीत. ही अभिमानाची गोष्ट आहे. हा मतदारसंघ नव्हे तर तुमचे कुटूंंब आहे. हे कुटूंंब तुम्हाला निवडूण देत आहे.

एवढा साधेपणा, एवढे लोकांचे प्रेम खरंच आपल्याला अभिमान वाटावा असे लंके यांचे काम आहे. लोकप्रतिनिधी कसा असावा तर आ. लंके यांच्यासारखा असावा. अतिशय सुंदर आदर्श त्यांनी महाराष्ट्राला घालून दिला आहे. आता महाराष्ट्रातच नाही तर दिल्लीपासून गल्लीपर्यंत लंके यांचे चाहते आहेत. लोकसभा निवडणूकीसाठी स्टार प्रचारक म्हणून आताच मी लंके यांचे बुकींग करून ठेवते आहे. 

तुम्ही जिल्हा सांभाळा. लंके यांना राज्यात प्रचार करायला पाठवायचं आहे. बुथ तुम्हीच सांभाळायचं आहे. लोकसभेला व विधानसभेला एक लाखांचे लिड द्यायचे आहे. लंके लोकांसाठी इतकी वर्षे फिरत आहेत. ते पाहता घरी बसले तरी त्यांना एक दिड लाखांनी निवडून द्यायला हवे. 

निवडणूक अगदी वन वे झाली पाहिजे. विरोधकांचे डिपॉजिट जप्त झाले पाहिजे. इतके सुंदर काम लंके यांनी केले आहे.तुम्ही निर्धार करून कामाला लागा असा सल्ला सुळे यांनी यावेळी दिला. 

मोहटादेवी यात्रेसाठी निघालेल्या भगिनींच्या चेहऱ्यावरील उत्साह पाहिला तर राष्ट्रवादी काँग्रेसने नीलेश लंके यांना तिकीट देण्याचा जो निर्णय घेतला तो महाराष्ट्रातील सगळयात चांगला व योग्य ठरल्याचे सांगत खा. सुप्रिया सुळे यांनी आ. नीलेश लंके यांचे मतदारसंघातील काम, मतदारांशी असलेली त्यांची निष्ठा, त्यांचा साधेपणा याचे तोंडभरून कौतुक केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post