नगर : जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेसाठी 16 ऑक्टोबरला मतदान होत आहे. त्यामुळे शिक्षक सध्या प्रचारात दंग झालेले आहेत.
जिल्हा प्राथमिक बँकेसाठी 16 ऑक्टोबरला मतदान होत आहे. त्यामुळे शिक्षक संघटनांसह मंडळांनी प्रचाराचा जोर धरला आहे. प्रचारासाठी जिल्ह्यातील काही प्राथमिक शिक्षकांनी रितसर रजा टाकलेली आहे. तर काहीजण विना रजाच प्रचार करीत फिरत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याकडे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे दुर्लक्ष झालेले आहे.
रजा न टाकता प्रचार कामात राहणार्या शिक्षकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पालकांमधून होत आहे. शिक्षण विभागाने शाळांना अचानक भेटी देईन शाळेत किती शिक्षक उपस्थित राहत आहेत, याची पडताळणी करणे गरजेचे आहे, असे मत आता पालकांमधून व्यक्त केले जात आहे.
दिवाळीची सुट्टी अगोदर सहामाही परीक्षा होत असते. या परीक्षेची तयारी शिक्षकांनी आता करणे गरजेचे.आहे. मात्र अनेक शाळेतील शिक्षक सध्या मंडळांच्या प्रचाराचे नियोजन करण्यात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे बँकेची निवडणूक पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी पालकांमधून व्यक्त होत आहे.
Post a Comment