नगर : मोहटा देवीच्या दर्शनासाठी रविवारी मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी केली होती. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. या कोंडीत आमदार निलेश लंके अडकले होते. भाविकांचे होणारे हाल लक्षात घेता त्यांनी रस्त्यावर उतरत स्वत: वाहतुकीची कोंडी सोडवली.
रविवारची शासकीय कार्यालयांसह शाळांना सुट्टी होती. त्यातच सातवी माळ असल्याने आज लाखोंच्या संख्यने संपूर्ण राज्यभरातून भाविक देवीच्या दर्शनासाठी आल्याने मोहटा देवी गड भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता.
आज पहाटे पाच वाजल्यापासूनच मुख्य गडाकडे जाणाऱ्या सर्वच रस्त्यावर वाहनांच्या मोठाल्या रांगा लागल्या होत्या. भाविकांमध्ये पायी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय होती. त्यातच आज केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड व खासदार डॉ. सुजय विखे हे सुद्धा देवीच्या दर्शनासाठी आल्याने पोलिसांची मोठी दमछाक झाली होती.
दिवसभर शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने ठिकठिकाणी वाहनांच्या एक ते दोन किलो मीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. कोरडगाव चौकात तर मोठी कोंडी होऊन त्यामध्ये निलेश लंके हे सुद्धा सापडले होते. मात्र ते वाहनाच्या खाली उतरले.
त्यांनी स्वतः वाहतूक पोलिसांना मदत करत वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचे काम केले. लंके हे स्वतः वाहतूक सुरळीत करत असल्याचे समजल्यानंतर त्यांच्या अनेक समर्थकांनी सुद्धा लंके यांना मदत करत होते.
जवळपास एक तास वाहनांची कोंडी सोडविण्याचे काम लंके त्यांनी केले. यामुळे भावीकांना दिलासा मिळाल्याने सर्वांनी आमदार लंके यांच्या कामाचे कौतुक केले.
Post a Comment