नगर : अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पीकनुकसानीची सर्व शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य तथा भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांनी केली आहे.
यावर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीला जून मध्ये पावसाने ओढ दिल्यामुळे खरीप पीकांच्या पेरण्या लांबल्या. जुलैमध्ये रिमझिम पावसावर पेरण्या झाल्या. पुन्हा ऑगस्टमध्ये ओढ बसली. मात्र सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये जवळपास रोजच पाऊस पडतो आहे. यामुळे जिल्ह्यातील मूग, बाजरी, उडीद, सोयाबीन, मका, कापूस, तूर , कांदा यासह फुलशेती आणि फळबागांचे अतोनात नुकसान झालेले आहे.
चिचोंडी पाटील (ता. नगर) 14 ऑक्टोबरला अवघ्या दोन तासात 85 मिलिमीटर पाऊस झालेला आहे. अशाच प्रकारे जिल्ह्यातील सर्व मंडळांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे.
दररोज होत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना शेतात जाता येत नाही . पिकांची काढणी करता येत नाही . रोज होणाऱ्या पावसामुळे शेतात तण माजले आहे .पावसामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे .रब्बी पिकांच्या पेरण्या लांबत आहेत
त्याचप्रमाणे रब्बी पिकांसाठी शेतीमशागतीचा खर्च बेसुमार वाढणार आहे. अतिवृष्टीमुळे खरीप पिके हातची वाया गेली असल्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा तोटा झालेला आहे . दिवाळीचा सण तोंडावर आल्यामुळे अनेक शेतकरी आर्थिक विवंचनेत आहेत.
या सर्व परिस्थितीचा विचार करून अहमदनगर जिल्ह्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, महसूल मंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अहमदनगर ,सर्व तहसीलदार व सर्व तालुका कृषी अधिकारी यांना भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाने निवेदन पाठविले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ज्येष्ठ विधीज्ञ कारभारी गवळी, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे राज्य सचिव श्री .अशोक सब्बन, शहराध्यक्ष अशोक ढगे, गणेश इंगळे .वीर बहादूर प्रजापती, भगवान जगताप, अशोकबापू कोकाटे, विलास खांदवे , बंडु खराडे , नानाभाऊ कोकाटे, हवामान तज्ञ आबासाहेब कोकाटे, देवीदास शेळके, कैलास खांदवे, संतोष वाडेकर व जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांनी केली आहे.

Post a Comment