अमर छत्तीसे
श्रीगोंदा : चालू वर्षी ७००.३ मिमी एवढा विक्रमी पाऊस झाला आहे पाऊसामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी दिवाळी साजरी करू शकणार नाहीत याची जाणीव ठेवून आमचे नागवडे कुटुंब देखील यंदा कसल्याच प्रकारे दिवाळी साजरी करणार नाही असे जिल्हा परिषद सदस्या तथा जिल्हा बँकेच्या संचालीका अनुराधा नागवडे यांनी आज श्रीगोंदा कारखान्यावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले.
सर्वच शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून पंचनामे न करता सरसकट सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी ७५हजार रुपयांची मदत मिळावी अशी मागणी आपण मुख्यामंत्र्यांकडे करणार असल्याचे नागवडे यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देखील आर्थिक मदत सरकारने करावी,सततच्या पाऊसामुळे दूधव्यवसाय देखील अडचणीत सापडला आहे त्याला सुद्धा सरकारने मदत करावी अशी मागणी कृषिमंत्री,पालकमंत्री यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हे सरकार शेतकऱ्यांना नक्की मदत करेल अशी आपल्याला अपेक्षा असून मदत न मिळाल्यास आपण रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी सरकारला दिला.
सर्व संचालक वेगवेगळ्या गटातून निवडून आलेले आहेत कारखान्याचे सर्व निर्णय संचालकांच्या एकमताने घेतले जातात त्यामुळे नागवडे कुटुंबावर एकाधिकारशाहीचा होणार आरोप चुकीचा आहे. उलट नागवडे कारखाना कायम शेतकऱ्यांचे पैसे वेळेवर अदा करतो. त्याबद्दल मात्र टीका करणारे विरोधक काहीच बोलत नाहीत, असेही नागवडे म्हणाल्या. यावेळी त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.
श्रीगोंदा तालुक्यात शेतकऱ्यांचं एवढं शेतीच नुकसान,आर्थिक नुकसान झालेलं आहे असं असताना इतर ठिकाणी कार्यरत दिसणारे आमदार आता त्यांचं सरकार असूनसुद्धा गप्प का आहेत याच नवल वाटत अस सांगत त्यांनी नाव न घेता आमदार बबनराव पाचपुते यांच्यावर टीका केली.
या पत्रकार परिषदेसाठी वागदरी गावचे सरपंच आदेश नागवडे, संचालक प्रशांत दरेकर, योगेश भोईटे, काँग्रेस तालुकाध्यक्ष धर्मनाथ काकडे, विजय खराडे उपस्थित होते.

Post a Comment