ते आले पाहिले अन् शेतकर्यांच्या व्यथा न ऐकताच गेले...

 अमर छत्तीसे 

श्रीगोंदा : डोळ्यासमोर उभी पिके पाण्यात गेली तोंडावर दिवाळी सण सर्वच बाजुने आलेल्या अडचणी यातून काहीतरी मार्ग शासन  काढेल या आशेवर असलेल्या शेतकरी राजाची व्यथा बांधावर जाऊन ऐकण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील  श्रीगोंदा तालुक्याच्या दौर्यावर होते. त्यांचा दौरा म्हणजे "ते आले त्यांनी पाहिले" व रवाना झाले. शेतकरी मात्र आहे, तिथेच चिखलात बसून राहिल.  


श्रीगोंदा तालुक्यात गेल्या महिनाभरापासून मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले आहे. या मात्र झालेल्या नुकसानी बाबत शासन निर्णय जाहीर करत नाहीत. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. अक्षरक्षः दिवाळी ही अंधकारमय झाली आहे. 

शासनाच्या मदतीकडे शेतकरी डोळे लावून बसले आहेत. अजून काही सरकारला घाम फुटलेला नाही. महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे व्यथा जाणून घेण्यासाठी तालुक्यात आले होते. 

मोठा शासकीय लवाजमा बरोबर होता. परंतु नियोजित दौरा आटोपता घेऊन मंत्री महोदयांनी तातडीने निघून जाणे पसंत केले. ज्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी महसूल मंत्री आले होते. त्यांचे गार्हाणेच ताफ्यातील कार्यकर्त्यांनी मंत्री विखे यांच्यापर्यंत पोहचू दिले नाही. 

शेतकर्यांच्या ऐवजी हेच कार्यकर्ते सांगत बसले होते. हा प्रकार पेडगाव येथील शंकरनगर येथे दिसून आला. कपाशी चे शेत पाहिले व मंत्री काहीतरी घोषणा करतील अशी आशा होती. यासाठी संवाद साधण्यासाठी पेडगाव गावात नियोजन केले होते. 

तशी नोंद शासकीय नियोजनात होती. अचानक साहेबांनी दौरा उरकता घेऊन पुढे रवाना होणे पसंत केले. त्यामुळे "ते आले त्यांनी पाहिले" असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post