दोन दिवस वाट पाहण्यात गेले,दोन दिवस दुःखात गेले
हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे
शेकडो वेळा चंद्र आला,तारे फुलले,रात्र धुंद झाली
भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली
या ओळी आहे कवी *नारायण सुर्वे* यांच्या भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली या कवितेतील. कवी नारायण सूर्वे यांनी समाजातील उपेक्षित घटकांसाठी ज्यांनी आपली सारी जिंदगी पोटाची खळगी भरण्यासाठी धडपड केली. त्या घटकांसाठी अतिशय समर्थपणे शब्दात मांडली आहे.
तद्वतच कवी संदीप राठोड यांनी नुकतेच *भूक छळते तेव्हा* या काव्यसंग्रह कलाकृतीचे मुखपृष्ठ प्रसिद्ध केले ते पाहून कवी नारायण सूर्वे यांच्या कवितेची आठवण झाली आणि त्यावर चार ओळी लिहण्याचा मोह आवरला नाही.
मला ठाऊक नाही किंवा त्यावर सखोल चर्चा देखील झाली नाही पण संदीप राठोड यांच्या *भूक छळते तेव्हा* या कलाकृतीचे मुखपृष्ठ मा संजयजी पठाडे सर यांनी मागील आठवड्यात मला पाठवले होते.
त्या मुखपृष्ठावरील संदर्भाला माझ्या आकलनशक्तीनुसार उकलण्याचा प्रयत्न केला आहे. कदाचित मुखपृष्ठकाराचा यामागील उद्देश हाच असावा किंवा याहून अधिक उच्च हेतू असावा असे मला वाटते. या मुखपृष्ठावर काही संदर्भ आलेले आहेत.
त्यात काळोख, शीर्षक, नाव, भाकर, सर्वात खाली काही महिलांचे व पुरूषांचे हात उंच करून भाकरीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या सर्व संदर्भाचा अर्थ उकलण्याचा हा छोटासा प्रयत्न.
*भूक छळते तेव्हा* या शीर्षकात तीन शब्द आहे तसेच या शीर्षकानंतर *…* असे तीन टिंब दिलेले आहेत आणि त्यानंतर खाली *संदीप राठोड* असे लिहले आहे. बघा किती योगायोग आहे की शीर्षकाचे शब्द तीन, त्यापुढे टिंब तीन, संदीप शब्दातही वर्णमालेतील तीन अक्षरे आणि राठोड़ यातही तीनच अक्षरे. या तीन अक्षरांनी आणि शब्दांनी या मुखपृष्ठाला एक वैश्विक अर्थ दिला आहे.
पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेत *आकाश , पृथ्वी आणि पाताळ* अशा तीन कक्षा आहेत आणि या तीनही कक्षेत मानव आपल्या टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी, आपल्या प्रपंचाचा गाड़ा हाकण्यासाठी धडपडत असतो. या तीन कक्षात येणारा कोणताही जीव या धडपडीतून सुटला नाही.
या धडपडीत असतांना सुख दुःखाला सोबती घेऊन कधी हसत तर कधी रडत जगण्याच्या हिशोबाचा ताळेबंद जुळता जुळता आयुष्य अलगद निसटून जाते ते कळतही नाही . श्वासागणिक आयुष्य संपत जाते. प्रत्येक क्षण स्वप्नपूर्तीसाठी हिशोबाची ताळमेळ करून, सुख दुःखाचा गाडा ओढला जातो.
नव्या अपेक्षेने, नव्या विचारांनी, नव्या ताकतीने मानव आपले प्रयत्न क्रीत असतो । पावलांगणिक त्याला प्रचंड संकटांना सामोरे जावून कधी जरासा विसावा घेऊन चालत रहावे लागते . आपल्या अवतीभोवती असणा-या लहानमोठ्या घटकांना सोबत घेऊन मानव आपले मार्गक्रमण करीत असतो तो केवळ आपल्या टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठीच.
या तीन त्रिकाळात कष्ट कुणालाही चुकले नाही. मग तो राव असो की रंक प्रत्येकजण भाकरीच्या शोधात असतो. या तीनही कक्षांचा विचार करून कवि संदीप राठोड़ यांच्या शीर्षकात तीन शब्द, आले असावेत.
तसेच शीर्षाकानंतर तीन टिंब आले आहे यांचा अर्थ असा की, या त्रिखंडात राहणारा प्रत्येक जीव *उत्पत्ती- स्थिती- लय* या तीन अवस्थेतून जात असतो. उत्पत्ती आणि लय याच्यामधील जो काळ असतो त्यालाच आपण जीवन म्हणतो आणि हे जीवन अतिशय खडतर असते, जो या जीवनाचा अर्थ समजून घेतो.
त्यालाच भाकरीचा चंद्र प्राप्त होत असतो, यानंतर संदीप या शब्दांत तीन अक्षरे आले आहे यांचा अर्थ असा की *उत्पत्ती स्थिती आणि लय* यातून जात असतांना *बाल्यावस्था - युवावस्था -वृद्धावस्था* अशा तीन अवस्थांमधून जावून जो प्रयत्नांची काष्ठा करतो त्यालाच भाकरीचा चंद्र प्राप्त होत असतो. तसेच राठोड़ या शब्दांत तीन अक्षरे आहेत.
यांचा अर्थ असा की, पृथ्वीतलावर तीन ऋतूचक्र आहेत *उन्हाळा- पावसाळा आणि हिवाळा* या ऋतूचक्रातून जात असतांना *सकाळ- दुपार- संध्याकाळ* हे तीन ही काळ मानवाला खडतर परिश्रमातून नेत असतात. जो या तीन ऋतू आणि तीन अवस्थांमधून कष्टमय जीवन जगून जातो त्याला भाकरीचा चंद्र प्राप्त होत असतो. हे संदर्भ याकरीता घेतले असावेत की यातून जो जातो त्याला भाकरीच्या शोधात फिरावेच लागते.
या मुखपृष्ठावर काही हात दाखवले आहेत या हातात जर निरिक्षण करून पाहिले तर असे जाणवेल की , एका स्रीच्या हातात बांगड्या दिसत आहेत त्यादेखील तीनच आहेत. किती विलक्षण योग आहे यातून एक गहन अर्थ जाणवतो तो म्हणजे मानवाच्या आयुष्यातील तीन काळ आहेत.
पहिली बांगड़ी जी सर्वात आधी घातली तो पहिला भुतकाळ आहे जो मागे निघून गेला आहे तो भुतकाळ मानसाने कधीच विसरू नये , दुसरी बांगडी म्हणजे दुसरा वर्तमानकाळ ज्या काळात आज आपण उपभोग घेत आहोत हा खरा जीवन जगण्याचा काळ आहे.
तिसरी बांगडी जी मनगटात पहिल्या क्रमांकावर आहे याचा अर्थ असा की , जर वर सांगितल्याप्रमाणे कष्ट केले तर मनगटाच्या जोरावर म्हणजेच कष्टाने येणारा भविष्यकाळ उज्वल आहे म्हणून तीसरी बांगडी ही भविष्यकाळ दर्शवते
यात दोन पुरूषांचे हात आहे तर दोन महिलांचे हात आहेत, यांचा अर्थही खूपच छान आहे. जर आपले कुटुंब सुखी ठेवायचे असेल तर कुटुंब लहान असले पाहिजे. पती पत्नी सोबत एक मुलगा आणि एक मुलगी हे आज सुखी जीवनाचे घटक असल्याचा संदेश यातून मला भावला.
या चौघांनी म्हणजेच परिवाराने एकसाथ जर कष्ट केले तर संसारगाडा व्यवस्थितपणे चालू शकेल. या मुखपृष्ठावर काळोख दाखवला असून या काळोखात भाकरीचा चंद्र दाखवला आहे. हा काळोख म्हणजे जीवनात येणारे संकटे आहेत, या संकटातून सहिसलामत सुटून वर भाकरीचा चंद्र हातात येण्यासाठी हात वर केले आहेत.
या चंद्रावर म्हणजेच भाकरीवर काही डाग दाखवले आहेत हे डाग म्हणजे त्या कष्टक-यांच्या घामाचे डाग आहेत. हे कष्टाचे प्रतिक आहे. टिचभर पोटाला लागणारी कोरभर भाकर मिळवण्यासाठीची धडपड आणि त्या केलेल्या धडपडीतून निढळावरून निथळलेल्या घामाचे डाग या भाकरीच्या चंद्रावर असल्याचे भासले आहे.
अतिशय कल्पकतेने नटलेले आणि कष्टकरी , श्रमजीवी समाजाच्या जीवनाचे संदर्भ असलेले हे मुखपृष्ठ साहित्य वर्तुळात नक्कीच एक वेगळा ठसा उमटवणारे आहे. हे मुखपृष्ठ ईतके अर्थपूर्ण आणि समर्पक आहे यावरून आतील साहित्याचा , कवितेचा दर्जा निश्चितच कलाकृतीला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारा आहे यात शंकाच नाही.
कवी संदीप राठोड यांच्या दोन चार कविता समुहात वाचल्या आहेत त्या दर्जेदार आहेतच पण एकुणच कलाकृती वाचल्यानंतर त्या कलाकृतीचे साहित्यिक मुल्य नक्कीच दर्जेदार असेल यात शंकाच नाही. कवी संदीप राठोड यांच्या येणा-या काव्य कलाकृती *भूक छळते तेव्हा...* प्रकाशनास हार्दिक शुभेच्छा. मा संपादक साहेब, मुखपृष्ठकार, अक्षर जुळवणीकार, मुद्रणकार यांना साहित्य कलाकृती प्रकाशनाच्या प्रकाशनपूर्व हार्दिक शुभेच्छा. वाचकांना ही साहित्य कलाकृती नक्कीच आनंद देईल यात शंकाच नाही. तुर्तास इतकेच.
Post a Comment