मातृत्वाची जाण असलेला मातृविशेषांक....

अतिशय सुंदर मुखपृष्ठ.... मातृविशेषांक साहित्य लोभस* अतिशय अर्थपूर्ण मुखपृष्ठ. किती व्यापक अर्थाने या मुखपृष्ठाला साकारले आहे. 


स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी या उक्तीप्रमाणे आईचे स्थान‌ जगात श्रेष्ठ मानले जाते. किंबहुना आई सारखे दैवत नाही असेही पोथी पुराणात म्हटले जाते.

अनादी काळातही मातृसत्ताक पद्धती होती. आई म्हणजेच एक स्री , ही‌ स्री त्या काळात कुटुंब प्रमुख होती. या स्त्रीनेच शेतीचा शोध लावला असे फार वर्षांपूर्वी वाचनात आले होते.  आईला त्रैलोक्याची माता म्हटले जाते. रक्ताचं क्षिरामृत करून लेकराला पाजले जाते , त्याला मोठं केलं जातं यापेक्षा जगात सुंदर काय असू शकतं. 

अशा मातृत्वाला अर्पण केलेला हा दिवाळी अंक . या अ़काच्या मुखपृष्ठाची सजावट करतांना‌ मुखपृष्ठकार आणि संपादक या़च्या मनात काय आले असावे की त्यांनी या मुखपृष्ठाची निवड केली. 

वरवर पाहता या मुखपृष्ठावर वरच्या डाव्या कोप-यात *मातृविशेषांक* असं लिहिलेलं असून त्यातून एका स्त्रिचा चार बांगड्या घातलेला हात खालच्या दिशेने आलेला आहे आणि हाताच्या तर्जनीला लहान बाळाने  धरुन ठेवलेले आहे.

तसेच दिवाळी अंकाचे नाव *साहित्य- लोभस* असे असून लोभस या शब्दावर दिलेल्या टोपीची एक रेष लांबवर नेली आहे आणि त्या रेषेला आकाशकंदील लटकलेला दिसत आहे. त्याखाली *दिवाळी विशेषांक २०२२* आणि *किंमत रू २००.

या सर्व प्रत्यक्ष बाबी आपल्या नजरेसमोर येतात मात्र हे शब्द, हात ,असेच का दाखवले असावे, लोभस या शब्दावर दिलेली टोपी पुढे का लांबलेली असावी यावर थोडासा विचार केला तर खूप काही अर्थ यातून उलगडत जातात. 

आपण एक एक मुद्दा बघू....सर्वात प्रथम आपण या मुखपृष्ठावरील स्ट्रक्चरवर विचार करू 

अतिशय अवघड असं हे स्ट्रक्चर आहे. *हिरव्या व केशरी रंगात वेड्यावाकड्या वाटा रेघाट्या मारल्यासारख्या दाखवल्या आहेत. हिरवा रंग निसर्गाशी, या भूमीशी जोडला गेला आहे जी भूमी जगाला अन्न देते तीला ही माता म्हटले जाते तसेच केशरी रंग हा त्यागाचा संदेश देतो, हा त्याग म्हणजेच स्री. स्री आणि त्याग हे नातं या भूमीशी साधर्म्य दर्शवते. 

आयुष्यात प्रचंड त्याग करून स्री आपल्या परिवाराला सांभाळत असते. माहेरचा त्याग करून सासरी येत असते तेथेही आपल्या भावनांचा त्याग करून सासरच्या गोतावळ्यात रमून जाते*.  हे स्ट्रक्चर निट पाहीले तर त्यात विश्वाचा पसारा  दिसतो आणि त्यातही असंख्य गुंतागुंत दिसते. 

गुगलमॅपवर एखादे ठिकाण शोधत जावे तसे या स्ट्रक्चरमधून जगाच्या पसा-यात स्रीमनाच्या भावनांचा कल्लोळ झालेला दिसतोय, त्यातूनही ही‌ स्री स्वतः:ला सावरुन घेत आहे. या स्रीने जग निर्माण केले आहे. जगत् जननी त्यामुळेच तिला म्हटले जाते. 

आदी मानवाच्या काळात सिंधू संस्कृतीमध्ये मातृसत्ताक पद्धती अस्तित्वात होती. पुरूष शिकार करून आणायचे तेव्हा घर सांभाळणारी माता कुटुंब प्रमुख होती. सारे व्यवहार स्री बघत असे. आजही आपण जर पाहिले तर प्रत्येक घरात स्री पुढाकार घेतांना दिसत आहे. 

काही समाजात , काही घरात पुरूष मंडळी फक्त नावाला आहेत, सर्व व्यवहार स्त्री बघते, कामाला जाते, घरी आल्यावर मुलांचे संगोपन, त्यांचे शिक्षण, लग्न आदी कार्यात स्री पुढे असते. म्हणजेच काय तर परंपरेने घालून दिलेले रितीरिवाज, अघोषित नियम मोडून ती पुरूषांबरोबरीने समाजात वावरताना दिसत आहे.

 हे सर्व करत असताना तीने मुलांचे संगोपनावरही आपले लक्ष केंद्रित केले आहे म्हणूनच तिच्या तर्जनीला धरून बाळ या विश्वाच्या पसा-यात येवू पहात आहे. हे मुखपृष्ठकाराला येथे सुचित करायचे असावे असे वाटते. या मातेच्या हातात चार बांगड्या दिसत आहेत यांचा अर्थ असा की , हा विश्वाचा पसारा चारही बाजूंनी व्यापलेला आहे.

या पहिली बांगडी पूर्व दिशादर्शक आहे, ती जे कार्य करेल, तीने जे ठरवले ती पूर्व दिशा आहे. म्हणूनच म्हणतात ना- सावित्रीने यमाला सुद्धा माघार घ्यायला लावली , आणि रणचंडीकेने दैत्यांचा सर्वनाश केला ही स्रीचीच रूपे आहेत. 

शेवटची बांगडी पश्चिमेची आहे.. कितीही संकटे आली तरी शेवटच्या अंतापर्यंत हार मानणार नाही, शेवटपर्यंत लढा देणार  , मुलांसाठी, परिवारासाठी ही माता अथक परिश्रम करत असते. 

मधल्या दोन‌ बांगड्या दक्षिणोत्तर लौकिकतेच्या आहेत. कोणत्याही दिशेला जा या मातेचे अधिराज्य दिसून येतेच.‌ 

संपादकांनी मातृविशेषांक असे नाव देवून महिलांच्या कलागुणांना संधी दिली आहे, तीच्यातील कर्तुत्वाचा सन्मान केला आहे. स्त्रीचा सन्मान करून तिचा आदर राखला आहे. अशीच मातृत्वाविषयीची जाणिव जर प्रत्येकाने मनात ठेवली तर मातोश्री वृद्धाश्रम बंद करण्यास वेळ लागणार नाही. 

अशा विविध कलागुणांचा संगम करून हा दिवाळी अंक मातृत्वाला अर्पण केलेला दिसून येतो.

आपण पाहिलं आहे की , या मुखपृष्ठाला मातेचे स्थान दिलेले आहे. आता या मुखपृष्ठावरील आणखी काही बाबींचा उलगडा करून बघू, जेणे करून मा संपादकांना हा संदर्भ असाच का घ्यावा‌ वाटला असावा. कारण सहज लिहणे आणि जाणिवपूर्वक लिहिणे यात खूप अर्थ असतो. 

या मुखपृष्ठावर *साहित्य-लोभस* हा शब्द जाणिवपूर्वक लिहिताना संपादकीय मंडळातील किमान चार जणांनी विचार करून हा शब्द निवडला असावा आणि मुखपृष्ठकाराला तो अंतिम करायला सांगितला असावा. अगोदर हा शब्द साधा घ्यावा असा विचार झाला असावा , पण नंतर आतील साहित्यिक दर्जा पाहून कुणीतरी सुचवलेले दिसत आहे की या शब्दाला पांढ-या रंगात घ्या , पांढरा रंग शांततेचं प्रतिक आहे, आणि आपल्या साहित्यातून ही शांतता दिसून आली पाहिजे असे किंचितशी मनात कल्पना आली असावी. 

तसेच साहित्य लोभसचा फाॅंट (आकार) हा देखील वेगळ्या पद्धतीने घेतला आहे यात *स* च्या खालची रेषेला ओंजळ करून *स* ला दिलेला काना ओंजळीत घेतलेला आहे  याचा अर्थ इथे एकमेकांना एकमेकांच्या साथीने जोडले आहे, काना म्हणजे सहकारी आहे त्यांच्या शिवाय काम पूर्ण होणार नाही‌.  तसेच *ह* या अक्षरांला ओंजळ करून जणू शब्द उचलून धरला आहे. याला लाक्षणिक अर्थाने बघीतले  संपादकीय मंडळाच्या कल्पकतेला सलाम आहे. 

याचा अर्थ असा होतो की- *या अंकात जे लिखाण आले आहे ते आम्हाला आईप्रमाणे मातेप्रमाणे  वंदनीय आहे. यातील प्रत्येक शब्द अन् शब्द तोलामोलाचा आहे. यातील लेखक कवी हे तोलामोलाचे आहेत त्यामुळे आम्ही त्यांचे शब्द खाली पडू देणार नाही, एकमेकांना आधार द्यावा तसे आधाराने ही ओंजळ केली असावी.  या शब्दांचा आम्ही आदर करतो. म्हणूनच त्या शब्दांना लहान मुलांसारखे अलगद उचलून धरले आहे. 

जसे लहान मुलं दोन्ही हातांच्या ओंजळीत धरले जाते तसे उचलून धरले आहे*.  आम्हाला  *व्यक्ती पेक्षा* त्यांच्या विचारांना स्थान द्यायचे आहे. तोंड बघून साहित्य स्वीकारलेले नाही तर विचारांचा दर्जा बघून साहित्य स्वीकारलेले आहे हा अर्थ संपादकीय मंडळाला अभिप्रेत असावा.  

दुसरे असे की *लोभस* या शब्दावर जी टोपी दिली आहे ती लांबवर नेली आहे -  *याचा अर्थ असा की, आम्हीं जी साहित्य सेवा करत आहोत ती काही एका दिवसापूरती मर्यादित नाही, तिला परंपरा आहे, आणि त्यातही हे जनमानसात  लोभस आहे. आणि ही सेवा इथेच न थांबता पुढेही अशीच चालू राहणार आहे यात तिळमात्र शंका नाही* तसेच या अंकात निवडलेले साहित्य हे समांतर पातळीवरचे आहे.

या लांबवर ओढलेल्या रेषेप्रमाणे सर्व समांतर आहेत. कुणाचे श्रेष्ठ अथवा कनिष्ठ नाही या अर्थाने ही रेषा लांबवर ओढली असावी असे मला वाटते तसेच यातील साहित्य हे निश्चितच *लोभस* आहे. प्रत्येकाने या साहित्याला लोभसवाणे देखणे रूप यावे म्हणून प्रयत्न केलेले आहे. 

त्यानंतर या लोभस शब्दांच्या लांबवर गेलेल्या टोपीला छानपैकी आकाशकंदील लटकवलेला दिसत आहे. हा कंदील इथेच का घ्यावा वाटला असावा.?  आधी तो मध्यभागी होता असे वाटते, पण मध्यभागी घेतला तर त्याला लटकवायचा कसा हा प्रश्न निर्माण झाला असावा, मग तो वर कोप-यातही बरा दिसला नसता.

त्यामुळे मनात एक आयडिया आली असावी आणि लोभसची टोपी वाढवून तिला तो आकाशकंदील लटकवला असावा. त्यामुळेच लोभस असलेले साहित्य जगाच्या पसा-यात जसे *आकाशात शुक्रतारा एका अढळ स्थानी चमकत असतो* तसे हे लोभस साहित्य अढळस्धानी आहे आणि ते चमकत राहणार हा मतितार्थ यातून मला भावला. 

यानंतर या मुखपृष्ठावर पांढ-या शुभ्र अक्षरात *दिवाळी विशेषांक २०२२* असे लिहले आहे याचाही‌ मतितार्थ पुढील भागात जाणून घेऊ...

या मुखपृष्ठावर दिवाळी विशेषांक २०२२ असे छापलेले आहे. खरं तर यात असं खास काही नाही, पण यामागे काही अर्थ दडलेले असतात. २०२२ या वर्षातला हा दिवाळी विशेषांक यातील अंक २+०+२+२=६ होतात आणि 

सा+हि+त्य+लो+भ+स = सहा अक्षरें हा योगायोग मला दिसून आला आहे. यातील ६ हा आकडा या अंकात सहा गुणविशेष दर्शवतो

सा- सामाजिक दृष्टीकोन

हि- हि-यासारख्या निवडक साहित्याचा समावेश 

त्य- त्य जोडाक्षराप्रमाणे साहित्यिक जोडली गेलेली आहे

लो- लोककला, ग्रामीण जीवनशैली जोपासली आहे

भ- भरपूर आनंद देणारं

स- समांतर दर्जा

असे सहा गुण आहेत 

या अंकावर अत्यंत सुंदर सुभाषित लिहिले आहे.

*जगी माऊली सारखी कोण आहे*

*जिचे जन्मजन्मांतरी ऋण आहे*

*असे ऋण हे की जया व्याज नाही*

*ऋणाविन त्या जीवना सांज नाही* 

अतिशय अर्थपूर्ण मुखपृष्ठ आणि समर्पक शीर्षक असलेल्या दिवाळी मातृविशेषांकाला, संपादकीय मंडळाला, मुखपृष्ठकाराला, मुद्रक, अक्षर जुळवणीकाराला, अंतर्रंगातील साहित्याला, सर्व लिहित्या हातांना पुढील दर्जेदार साहित्य निर्मितीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा...

- प्रशांत वाघ *(पॅसिफिक टायगर), संपर्क - तीन सत्ते एकोणचाळीस पंचवीस हजार


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post