पुणे ः संजय राऊत ज्यांना गुरू मानतात. त्या शरद पवारांचा इतिहास खंजिराचाच आहे, अशी टीका उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
पुणे येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी असे वक्तव्य केले. यावेळी भाजापाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 16 नोव्हेंबर रोजी त्यांच्या स्मृतिस्थळाला भेट दिली होती. या भेटीच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीकाही केली होती.
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला हात जोडायला जात असाल, तर हातातील खंजीर बाजूला ठेवा, असे खासदार राऊत यांनी म्हटले होते. याच टीकेला चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले आहे.
पाटील म्हणाले की, संजय राऊत ज्यांना गुरू मानतात, त्या शरद पवारांचा इतिहास खंजिराचाच आहे. शिंदे गटाच्या खंजिराला एक पार्श्वभूमी आहे. उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाचा विसर पडल्यामुळे व ते असह्य झाल्यामुळे शिंदे यांनी शिवसेना सोडली. पण त्यांचा हा आपसातला विषय आहे, असे ही ते म्हणाले.
या टीकेवर आता संजय राऊत काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राऊत व शिंदे यांच्यातील संघर्षात आता शरद पवार यांना चंद्रकांत पाटील यांनी ओढले आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीची भूमिका काय रहाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Post a Comment