पुणे : जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पारगाव येथे मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. पारगाव हद्दीमध्ये भीमा नदीच्या पात्रात आढळलेल्या सातही जणांची हत्या झाली असल्याची घटना उघडकीस आली असून पाच संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली.
दौंड तालुक्यातून वाहणाऱ्या भीमा नदी पात्रात टप्प्या-टप्प्याने सात मृतदेह आढळून आल्यामुळे पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. संबंधित घटना घातपात, अपघात की आत्महत्या याचा तपास लावण्याचे आवाहन पोलिसांपुढे निर्माण झाले होते.
पोलिसांनी वेगाने तपासाची दिशा फिरवली. त्यामुळे संबंधित सातही जणांची हत्या झाल्याचा संशय वाढत गेला. त्या दृष्टीने तपास केला असता मयतांच्या नातेवाईकातील पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
पाचही आरोपी हे सख्खे बहीण व भाऊ आहेत. यामध्ये अशोक कल्याण पवार, श्याम कल्याण पवार, शंकर कल्याण पवार, प्रकाश कल्याण पवार, व कांताबाई सर्जेराव जाधव (सर्व राहणार -ढवळे ळा निघोज, ता. पारनेर जि.अहमदनगर) यांचा समावेश असून आरोपी कल्याण पवार याचा मुलगा धनंजय याचा काही महिन्यापूर्वी वाघोली (ता. हवेली) येथे अपघाती मृत्यू झाला होता.
त्या मृत्यूमध्ये मयत मोहन उत्तम पवार व त्याचा मुलगा अनिल मोहन पवार हे जबाबदार आहेत असा आरोपींना संशय होता. त्याचा राग मनात धरून बदला घेण्याच्या उद्देशाने सात जणांची हत्या झाल्याचे पोलिसांच्या प्रथमदर्शनी समोर आले आहे. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय अधिकारी राहुल धस करत आहेत.

Post a Comment