नेवासा : तालुक्यात मंगळवारी (ता. २४) ला विजेचा कडकडाट, वादळी झालेल्या जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसाने रब्बी हंगामातील पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.
मंगळवारी सायंकाळी सात वाजल्यापासूनच नेवासा तालुक्यातील सोनई, घोडेगाव, कुकाण्यासह परिसरात वातावरण होते. रात्री सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पावसास सुरुवात झाली. तब्बल तासभर कमी-अधिक प्रमाणात वादळी वाऱ्यासह तालुक्यात सर्वदूर पाऊस झाला.
तालुक्यातील कुकाणे, जेऊर हैबती, तरवडी, देवगाव, देडगाव, चांदे, घोडेगाव, वडाळा बहिरोबा, कोठे, नजिक चिंचोली, भेंडा, माका, खेडले परमानंद, शिरगाव, पानेगावसह मुळाथडी परिसरात वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे.
राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरात मंगळवार (दि.२४) रोजी रात्री आठच्या सुमारास जोरदार वादळासह गारपीठ झाली. या वादळ व गारपिठीत गहू, हरभरा कांदा पिकाचे मोठे, हरभरा कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले.
सुमारे २० ते ३० मिनिट गारांसह मुसळधार पाऊस झाला. यामुळे गव्हाचे पिक भूईसपाट झाले. आधीच परतीच्या पावसाने या भागातील खरिपाच्या पिकांचे मोठे नुकसान झालेले असताना त्याची भरपाई शेतकर्याच्या पदरी पडलेली नाही. त्यातच आता पुन्हा रब्बी पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. शेतकरी आता आसमानी संकटापुढे हतबल झाला आहे. शासनाने झालेल्या गारपीठीचा पंचनामा करावा, अशी मागणी होत आहे.

Post a Comment